मुंबई - येथील वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे राहतात. त्याच मतदारसंघातील आमदार तृप्ती सावंत यांना शिवसनेने उमेदवारी न दिल्याने बंडखोरी केली. तर, सावंत यांनी बंडखोरी केली असली तरी त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. वांद्रे मधील मतदार महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्या पाठीशी आहेत असा दावा मुंबईचे महापौर व वांद्रे पूर्व मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला. नगरसेवक आणि महापौर म्हणून अनेक विकासाची कामे केलीत ती कामे घेऊन निवडणुकीला सामोरे जात असल्याचे महाडेश्वर यांनी सांगितले.
वांद्रे पूर्व मतदारसंघामधून शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीकडून मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर विधानसभेची निवडणूक लढत आहेत. वांद्रे पूर्वमधूनच आमदार म्हणून तृप्ती सावंत या निवडून आल्या होत्या. यावेळीही त्यांनी उमेदवारी मिळावी म्हणून 'मातोश्री'कडे आग्रह धरला होता. मात्र, या मतदार संघामधून महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात आल्याने सावंत यांनी बंडखोरी केली. त्यामुळे मतदारसंघात स्वतःच्या पक्षाचा उमेदवार असल्याने महापौर महाडेश्वरांना विशेष अशी मेहनत घ्यावी लागत आहे.
हेही वाचा - महाजनादेश यात्रेनंतर मुख्यमंत्र्यांची 'मुंबई चाले भाजपासोबत' प्रचाराला सुरुवात
याबाबत महापौरांशी संपर्क साधला असता शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. मतदार शिवसेनेच्या आणि माझ्या पाठीशी असून वातावरण अत्यंत चांगले आहे. त्यामुळे उमेदवार कोण आहे, याकडे आम्ही पाहत नाही. आम्ही शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन काम करत आहोत. मतदारांशी असलेली बांधिलकी घेऊन लोकांसमोर जातोय. महायुतीचा उमेदवार म्हणून मतदार माझ्या पाठीशी उभे आहेत असे महाडेश्वर म्हणाले.
हेही वाचा - मुंबईच्या ग्रँट रोड परिसरातील आदित्य आर्केड इमारतीला भीषण आग
मतदारांच्या गरजा आणि मतदारसंघात अनंत प्रश्न असतात. एक प्रश्न सोडवला की दुसरा प्रश्न निर्माण होतो. लोकांचा प्रश्न विधिमंडळात उपस्थित करून तो सोडवणं हेच लोकप्रतिनिधींचं काम असते. मतदारसंघात सरकारी वसाहत आहे, या वसाहतीमधील कर्मचाऱ्यांना स्वतःचे घर मिळवून देणे. मुंबईत म्हाडाच्या 56 वसाहती आहेत, त्यापैकी १ वांद्रे पूर्व मतदार संघात आहे. त्या वसाहतीचा पुनर्विकास करून त्यामधील रहिवाशांना हक्काची घरे मिळवून देणे. संरक्षण मंत्रालयाच्या जमिनीवर झोपड्या मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी व्हावे, एसआरए प्रकल्प राबवला जावा म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहे. केंद्र आणि राज्य सरकार सकारात्मक असल्याने हे प्रश्न मार्गी लागतील असे महाडेश्वर म्हणाले.
हेही वाचा - 'गुजरात्यांनी आंदोलन केले की नेतेपद, आम्ही केली की खटले'
नगरसेवकांना महापालिकेत जनतेचे प्रश्न कसे मांडायचे याचे प्रशिक्षण मिळते. मी ३ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलो. महापौर म्हणून काम करण्याची संधी पक्ष प्रमुखांनी दिली. मी मुंबईतील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. कोस्टल रोड, गोरेगाव, मुलुंड, लिंक रोड, 120 एकरवर प्राणी संग्रहालय बनवत आहोत, भायखळा येथील गिरणी म्युझियमच्या ठिकाणी गिरणी कामगारांना घरे कशी मिळतील यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा - 'कुठे नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र?'
महापौर निधीमधून गरीब रुग्णांना 5 हजार रुपये आर्थिक मदत केली जात होती. त्यात वाढ करून आता ती 25 हजार इतकी केली आहे. रस्ते, पाणी, स्वच्छतेची कामे केली आहेत, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंदौर येथे स्वच्छतेचा पुरस्कार मिळाल्याचेही महाडेश्वर यांनी सांगितले.