मुंबई : मुंबईतील कानडी लोकांच्या नाड्या आवळण्यासाठी कानडी शाळांचे अनुदान थांबवले पाहिजे, असे विधान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. त्यासाठी नगरसेवकांनी आपल्याला पत्र द्यावीत, असे आवाहनही महापौरांनी केले आहे. महापौर हे पद संवैधानिक असल्याने या विधानावरून राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बेळगावातील मनगुत्ती गावातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आल्यानंतर सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. आंदोलने केली जात आहेत. असेच एक आंदोलन लालबाग येथे करण्यात आले. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आणि विभाग प्रमुख नगरसेवक आशिष चेंबूरकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान महापौर बोलत होत्या. यावेळी बोलताना, बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळात ‘हटाव लुंगी, बजाव पुंगी’ आंदोलन करण्यात आले होते. त्याप्रमाणे “कानडी लोकांच्या इथे नाड्या आवळल्या, तर जे कर्नाटकमधील लोक आहेत त्यांना समजेल. 'पुन्हा पुंगी वाजवण्याचे दिवस आलेले आहेत' असे महापौर म्हणाल्या. कानडी लोकांच्या नाड्या आवळण्यासाठी कानडी भाषिक शाळांचे अनुदान थांबवण्याची गरज आहे. त्यासाठी नगरसेवकांनी मला पत्र द्यावे, मी तसा प्रस्ताव तयार करून राज्य सरकारकडे सादर करेन, असेही महापौर म्हणाल्या.