मुंबई - शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्य़ा शेकड्याने वाढत आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण असणारे शहर मुंबई आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होत असताना या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी मुंबईच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पुढाकार घेतला आहे. महापौर या स्वतः नर्स असल्याने त्या मुंबईतील रुग्णालयात कोरोनावर उपचार करणाऱ्या नर्सना मार्गदर्शन करणार आहेत.
![mumbai mayor kishoree pednekar will guide nurses in sion and nayar hospital](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/6958728_mumbmayor.jpg)
मुंबईत कोरोनाचे 5 हजाराहून अधिक रुग्ण असून 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णांवर आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स यांच्याकडून उपचार केले जात आहेत. मात्र हे उपचार करताना डॉक्टर नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे डॉक्टर, नर्स आदी कर्मचारी भीतीच्या छायेत आपला जीव मुठीत घेऊन उपचार करत आहेत. या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढावे, यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पुढाकार घेतला आहे. पेडणेकर यांनी स्वतः नर्स म्हणून काम केले आहे. माजी नर्स म्हणून त्या मुंबईतील महापालिका रुग्णालयातील नर्सशी संवाद साधणार आहेत. तसेच नव्या नर्सना मार्गदर्शन करणार आहेत. दोन दिवस मुंबई महापालिकेच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये हा संवाद आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी नायर रुग्णालय आणि दुसऱ्या दिवशी सायन रुग्णालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोशल डिस्टन्स पाळून हे संवाद आयोजित करण्यात आले आहेत.
नर्स ते महापौर पदाचा प्रवास -
किशोरी पेडणेकर यांचे वडील गिरणी कामगार होते. त्यांच्या लग्नानंतर त्या नाव्हा शेवा येथील रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी करत होत्या. समाजकार्य करताना त्यांनी वरळी लोअर परळ विभागातून शिवसेनेच्या कामाला सुरुवात केली. 2002 मध्ये त्या पहिल्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. महापालिकेत पेडणेकर यांनी विविध पदे भूषविली आहेत. सध्या त्या मुंबईच्या महापौर आहेत.