मुंबई - मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक भाजप लढवणार म्हणून ही निवडणूक चुरशीची होणार होती. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी आदी विरोधी पक्षांनी मदत न केल्याने भाजपने या निवडणुकीतून माघार घेतल्याची चर्चा आहे. यामुळे शिवसेनेचा महापौर निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर, काँग्रेसचा उमेदवार उभा करायचा की नाही याचा निर्णय आज(सोमवार) दुपारनंतर घेतला जाणार असल्याची माहिती विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी दिली.
मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेनेने वेगळी लढवली होती. त्यात भाजपचे 82 तर, शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आले होते. भाजपचा महापौर बसवण्याच्या हालचाली झाल्याने शिवसेनेने मनसेचे 6 नगरसेवक फोडून त्यांना पक्षात सामावून घेतले. काही नगरसेवकांचे जात पडताळणी प्रमाणपत्र बोगस ठरल्याने शिवसेनेची संख्या 94 झाली आहे. सर्वात जास्त नगरसेवक शिवसेनेचे असल्याने त्यांचा धोका कमी झाला होता.
हेही वाचा - मुंबईचा महापौर कोण? आज भरले जाणार अर्ज
दरम्यान, नुकत्याच विधानसभा निवडणुकीनंतर सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेने आपली महायुती तोडली आहे. यामुळे मुंबई महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेचा महापौर होऊ नये म्हणून भाजपने प्रयत्न सुरू केले होते. त्यासाठी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्षाच्या गटनेत्यांशी संपर्क साधला होता. मात्र, विरोधी पक्षांनी भाजपला प्रतिसाद दिला नसल्याने भाजपने महापौर निवडणुकीतून माघार घेतली आहे.
हेही वाचा - आज दिल्लीमध्ये पवार-गांधी भेट, सत्तास्थापनेबाबत चर्चा
काँग्रेसची आज बैठक -
महापौर पदासाठी उमेदवार द्यायचा की नाही याचा निर्णय अद्याप झालेला नाही. मागील 2017 च्या निवडणुकीत आम्ही उमेदवार दिला होता. पक्षश्रेष्ठी आणि मुंबई अध्यक्ष जो आदेश देतील तो आम्ही पाळू. सोमवारी दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांची बैठक महापालिकेत बोलावण्यात आली आहे. या बैठकीत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी दिली.
महापालिकेतील बलाबल -
शिवसेना- 94
भाजप- 83
काँग्रेस- 29
राष्ट्रवादी- 8
समाजवादी- 6
एमआयएम- 2
मनसे- 1
हेही वाचा - गोरक्षा, समाजसेवा अन् भव्य मंदिर निर्माण हीच आमची पुढील वाटचाल - मिलिंद परांडे