मुंबई - कोरोनाच्या प्रसारामुळे राज्यात लावण्यात आलेला लॉकडाऊन येत्या सोमवारी म्हणजेच 7 जूनपासून 5 स्तरांत हटवण्यात येणार आहे. मात्र, मुंबई पहिल्या की स्तरांत आहे, याची स्पष्टता नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली होती. यावर मुंबई तिसऱ्या स्तरांत असल्याचे स्पष्टीकरण महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे. यामुळे सरकारने तिसऱ्या स्तरासाठी जाहीर केलेले नियम मुंबईला लागू असणार आहेत.
मुंबईबाबत होती संभ्रमावस्था -
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केला. मात्र, आता राज्यात अनेक ठिकाणी पॉझिटिव्हीटी रेट कमी होत असल्याने राज्य सरकारकडून अनलॉक करण्यास पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. "मिशन बिगिन अगेन"अंतर्गत राज्यातील निर्बंधासाठी स्तर निश्चित करण्यात आले आहेत. याबाबत राज्य सरकारकडून आदेश काढण्यात आला आहे. तीन जूनला आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घोषणा केली होती. मात्र, हा निर्णय विचाराधीन असल्याचे सांगत राज्य सरकारकडून त्यांच्या घोषणेला बगल देण्यात आली. यानंतर ४ जूनला रात्री उशिरा अधिसूचना काढत राज्य सरकारने सोमवारपासून राज्यात अनलॉकची घोषणा केली आहे. राज्यात पाच स्तरांत अनलॉक करण्यात येणार आहे. त्यानुसार मुंबईतही ७ जूनपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट ५.२५ टक्के तर मुंबईमधील १२.५१ टक्के ऑक्सिजन बेड्स भरलेले आहेत. या आकडेवारीचा विचार केल्यास मुंबई पॉझिटिव्हिटी रेटनुसार तिसऱ्या तर ऑक्सिजन बेडच्या आकडेवारीनुसार पहिल्या स्तरात आहे. यामुळे संभ्रमावस्था दिसत होती.
मुंबई तिसऱ्या स्तरात -
राज्य सरकारने अनलॉकबाबत निर्णय घेतला आहे. सरकारने जाहिर केलेल्या मुंबईत ५.५६ टक्के पॉझिटिव्हीटी रेट आहे. तर १२.५१ टक्के ऑक्सिजनच्या खाटा भरलेल्या आहेत. यामुळे मुंबईचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आलेला आहे. शहरात कोणते व्यवहार सुरू राहतील, कोणते व्यवहार बंद राहतील, याबाबतचे परिपत्रक आज संध्याकाळपर्यंत काढले जाईल, असे महापौरांनी सांगितले. रेल्वेमधून सामान्य नागरिकांना प्रवास करण्याची मुभा देण्याचा निर्णय राज्य आणि केंद्र सरकार घेईल, असे महापौरांनी सांगितले.
हेही वाचा - maharashtra unlock पाच स्तरांमध्ये निर्बंध शिथिल, वाचा राज्यातील अनलॉक कसा असणार?
काय सुरू, काय बंद -
राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार ७ जूनपासून अनलॉक प्रक्रिया सुरू होत आहे. त्यानुसार सर्व दुकाने सायंकाळी चार वाजेपर्यंत खुली राहण्यास मुभा आहे. मॉल, थिएटर, नाट्यगृह बंद असतील. मैदाने आणि बगीचे सकाळी पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येतील. महत्त्वाची खासगी कार्यालय चार वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. तर शासकीय कार्यालय 50 टक्के उपस्थितीत सुरू राहण्यास मुभा आहे. लग्नासाठी केवळ पन्नास लोकांच्या उपस्थितीतची परवानगी देण्यात आली आहे. अंत्यविधीसाठी 20 लोकांना परवानगी असेल. महत्त्वाच्या मिटिंगसाठी 50 टक्के उपस्थिती असेल. केवळ बांधकाम स्थळी काम करणाऱ्या मजूर आणि कर्मचाऱ्यांना मुभा असेल. शेतीविषयक कामे चार वाजेपर्यंत करण्यास मुभा असेल. सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी असेल तर पाच वाजेच्या नंतर संचारबंदी लागू होणार आहे. जिम, सलून आणि ब्युटी पार्लर सायंकाळी चार वाजेपर्यंत केवळ 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहील. सार्वजनिक वाहतूक म्हणजेच बेस्टच्या बसेस आसन क्षमतेनुसार सुरू राहील.
सामान्य प्रवाशांना लोकल ट्रेन प्रवास नाही -
मुंबईतील लोकल सेवा ही केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी सुरू राहणार आहे. त्यामुळे मुंबईतील लोकलमधून सामान्य प्रवाशांना प्रवासाची मुभा दिली जाणार नाही. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा तपासला जाईल आणि त्यानुसार त्या जिल्ह्याला त्या त्या लेव्हलनुसार सूट दिली जाणार आहे. त्यामुळे येणारा काळात मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट झपाट्याने कमी झाला तर नक्कीच मुंबईकरांना लोकल सेवा खुली केली जाईल, असे आश्वासन विजय वडेट्टीवार यांच्याकडून देण्यात आले आहे.
हेही वाचा - फायझरची लस भारतातील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर कमी परिणामकारक