मुंबई - मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रुळांची देखभाल, अभियांत्रिकी आणि दुरुस्ती कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे अप - डाऊन धिम्या मार्गावर, हार्बर मार्गावर वांद्रे ते सीएसएमटी आणि पश्चिम मार्गावर राम मंदिर ते बोरवली दरम्यान सकाळी 10 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत काम चालणार आहे. सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागेल.
असा असेल मेगाब्लॉक
1. मध्य रेल्वे मार्ग- मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड या धिम्या मार्गावर सकाळी 11 वाजून 05 मिनिटांनी कामाला सुरुवात होईल. दुपारी 3.55 वाजेपर्यंत काम चालेल. धिम्या मार्गावरील वाहतूक या वेळेत पूर्णतः बंद राहील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणारी सकाळी 10.14 ते दुपारी 3.15 च्या लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी मेगाब्लॉक कालावधीत सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबा दिला आहे. मुलुंडपुढे धिम्या ट्रॅकवरून चालवण्यात येतील. त्यामुळे 15 मिनिटे वाहतूक उशिराने असणार आहे.
2. हार्बर रेल्वे- हार्बर मार्गावरील वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या डाऊन लाईनवर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेतला आहे. सीएसएमटी ते पनवेल मार्गावरील सेवा सकाळी 10 वाजल्यापासून पूर्णतः बंद राहील. दरम्यान कुर्ला ते वाशी - पनवेल विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.
3. पश्चिम रेल्वे- पश्चिम रेल्वे मार्गावरील राम मंदिर ते बोरवली स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. वाहतुकीचे वेळापत्रक यामुळे कोलमडून पडेल. सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत काम चालणार आहे. वाहतूक व्यवस्थेवर यामुळे परिणाम होणार आहे. मध्य रेल्वे, मुंबई विभागाकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे नियमितपणे केली जातात. त्यासाठी मेगा ब्लॉक घेतला जातो. हे वेळापत्रक पाहूनच मुंबईकरांना घराबाहेर पडावे लागणार आहे. अन्यथा मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-