मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएला आलेल्या धमकीच्या इमेल नंतर मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. कुठेही अज्ञात संशयास्पद वस्तू आढळल्यास त्यांनी याबाबत मुंबई पोलिसांना माहिती द्यावी, असे पोलिसांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी मुंबईत अनेक ठिकाणी हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. त्यात काही वेळेस फोन तर काही वेळेस ईमेलचा वापर करण्यात आला आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गेल्या वर्षी मुंबईत मिळालेल्या धमक्यांचा आढावा आपण घेऊयात..
दिवाळीत मिळाली होती हल्ल्याची धमकी : दिवाळीत मुंबईतील तीन ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणणार असल्याचा धमकीचा फोन मुंबई पोलीस नियंत्रण कक्षास कंट्रोलवर आला होता. हा फोन आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. इन्फिनिटी मॉल, जुहू पीव्हीआर आणि सहारा हॉटेल या तीन ठिकाणी बॉम्बहल्ल्याची धमकी देण्यात आली होती. अंधेरीतील इन्फिनीटी मॉल, जुहूतील पीव्हीआर आणि सहारा हॉटेल या तीन ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून हल्ला करण्याची धमकी या फोनवरुन देण्यात आली होती. मात्र पोलिसांच्या तपासात ही अफवा असल्याचे सिद्ध झाले.
रिलायन्स हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी : उद्योगपती मुकेश अंबानी यांना गेली यावर्षी ऑक्टोबर महिन्यात धमकी देण्यात आली होती. रिलायन्स फाऊंडेशन हॅास्पिटल येथे फोन करून ही धमकी देण्यात आली. हॉस्पिटलच्या नंबरवर एका अनोळखी नंबरवरून धमकी देण्यात आली. त्यात मुकेश अंबानी, नीता अंबानी यांना जीवे ठार मारणार असल्याचे सांगितले. तसंच रिलायन्स एचएन हॉस्पिटल उडवून देण्याची धमकीही देण्यात आली होती.
हाजीअली दर्ग्यावर हल्ल्याची धमकी : मुंबईतील प्रसिद्ध अशा हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये हा धमकीचा फोन आला होता. हा फोन उल्हासनगरमधून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. फोनवरील व्यक्तीने, मुंबईत ७ दहशतवादी येणार असल्याचे सांगितले. हे दहशतवादी हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा दावा फोनवरील व्यक्तीने केला. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात आलेल्या या फोननंतर प्रशासन आणि सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. या फोननंतर पोलिसांनी हाजी अली दर्ग्याच्या आजूबाजूचा परिसर, एल अँड टीच्या प्रोजेक्ट साइट हा सर्व भाग पिंजून काढला. मात्र, पोलिसांनी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही.
काही फोन करणाऱ्यांनाही झाली आहे अटक : गेल्या वर्षी 19 सप्टेंबर रोजी सोलापूर येथील एका २४ वर्षीय तरुणाला झवेरी बाजार येथे बॉम्ब असल्याची खोटी अफवा पसरवल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तसेच 17 सप्टेंबर रोजी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून दादर, परळ रेल्वे स्थानकावर दहशतवादी उपस्थित असल्याचे सांगणाऱ्या झारखंडमधील २१ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली होती. 26 ऑगस्ट रोजी ट्रॅफिक पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून भारतात 'सोमालिया टाईप अॅटॅक'चा संदेश आला. तर 24 ऑगस्ट रोजी ललित हॉटेलमध्ये धमकीचे फोन करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.