मुंबई - गेले सहा महिने कोरोनाचा प्रसार रोखण्याचे काम आरोग्य विभागाकडून केले जात आहे. त्यातच आता २० सप्टेंबरपासून पोलिओ लसीकरण करण्याचे निर्देश आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. यामुळे आरोग्य कर्मचारी व संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाचा प्रसार कमी झाल्यावर ही मोहीम राबवावी, अशी मागणी केली जात आहे.
मुंबईत मार्च महिन्यात पहिला कोरोना रुग्ण आढळून आला. तेव्हापासून पालिकेचा आरोग्य विभाग कोरोनाचा प्रसार रोखण्याचे काम करत आहे. रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यापासून ते घराघरात जाऊन रुग्ण तपासले जात आहेत. या कामात डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय, आया यांच्यापासून आरोग्य सेविका, सीएचव्ही वर्करही गुंतले आहेत. त्यातच आता नवजात बालकापासून पाच वर्षांच्या मुलांपर्यंत सर्वाना पल्स पोलिओची लस देण्याचे काम सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. २० सप्टेंबरपासून आठवडाभर उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे.
कोरोनाचा प्रसार होत असताना शाळा, मंदिरे सर्व बंद आहेत. आतापर्यंत याच ठिकाणी पोलिओची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली गेली. मात्र, आता शाळा मंदिरे बंद असताना इमारती, चाळींचे प्रवेशद्वार, पालिका दवाखाने, रस्त्यावर टेबल लावून ही मोहीम राबवावी लागणार आहे. कोरोनाच्या कामात असलेल्या कर्मचाऱ्यांनी लहान मुलांना हात लावल्यास त्यांना कोरोनाची बाधा होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.
'एका वेळी एकच काम द्या'
मुंबईत आरोग्य स्वयंसेविका मार्चपासून कोरोना प्रसार रोखण्यासाठी काम करत आहेत. त्यांच्यावर आता ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ सोपवण्यात येणार आहे. त्यातच त्यांना पल्स पोलिओ लसीकरणाचेगी काम दिले जाणार आहे. त्यामुळे 'एका वेळी एकच काम द्यावे', अशी मागणी महानगरपालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश देवदास यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्राद्वारे केली आहे. मुंबईत इमारतींमध्ये बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे सध्या पोलिओ लसीकरण मोहीम राबवू नये. कोरोनावर नियंत्रण मिळाल्यानंतर ही लसीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी केली आहे.