मुंबई - शहरातील सर्वात मोठे प्रदर्शन केंद्र असणाऱ्या गोरेगाव येथील नेस्को मैदानावर, देशातील सर्वात मोठे कोरोना विलगीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी या केंद्राची आज पाहणी केली.
नेस्को प्रदर्शन केंद्रामध्ये 5 मोठे प्रदर्शन सभागृह आहेत. या सर्व सभागृहांचं रूपांतर आता विलगिकरण कक्षात करण्यात येत आहे. हे संपूर्ण केंद्र एकूण 2600 खाटांच्या क्षमतेचे असणार आहे. याठिकाणी आयसीयूची सुविधा असणाऱ्या सुमारे 2000 खाटा असतील.
महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे आणि स्नानगृहे, गिझर यासह प्रत्येक बेडला स्वतंत्र पंखा दिला जाणार असल्याची माहिती अस्लम शेख यांनी दिली. येथे ठेवण्यात येणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या नातलगांना त्रास होऊ नये म्हणून येथे विविध मदत कक्ष देखील बनवण्यात येत आहेत. ज्यामध्ये चौकशी कक्ष, निर्जंतुकीकरण कक्ष, वैद्यकीय तपासणी असे विविध कक्ष असतील.
पुरेसे वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका याठिकाणी नेमण्यात येणार आहेत. 300 खाटा डायलेसिस व अतिदक्षता विभागासाठी राखीव ठेवण्यात येतील. संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केल्यानंतर या तयारीबाबत आदित्य ठाकरे व अस्लम शेख यांनी समाधान व्यक्त केलं.
हेही वाचा - मोदी सरकारचे आर्थिक पॅकेज म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार - बाळासाहेब थोरात
हेही वाचा - कोरोनामुळे मुंबईतील पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू; राज्यात 10 कोरोनाबाधित पोलिसांचा मृत्यू