मुंबई Mumbai Gangrape News : मुंबईच्या चेंबूरमधील पोस्टल कॉलनी येथील भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी) क्वार्टर्स येथील एका फ्लॅटमध्ये 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर दोन नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडलीय. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी दोन नराधमांना अटक केली असल्याची माहिती चेंबूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नागराज माजगे यांनी दिलीय.
बहिणीसोबत राहात होती पीडित तरुणी : चेंबूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामूहिक बलात्काराची घटना 15 ते 16 नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडलीय. पालघर जिल्ह्यातील भोईसर इथं आई आणि बहिणीसोबत राहणारी पीडित मुलगी बऱ्याचदा बीएआरसीमध्ये काम करणाऱ्या तिच्या वडिलांकडे राहते. जवळपास वर्षभरापूर्वी तिच्या वडिलांना एका इमारतीत फ्लॅट देण्यात आला होता. पहिला आरोपी अजितकुमार यादव (26) हा जवळच्या फ्लॅटमध्ये राहत होता. त्याचे वडीलदेखील बीएआरसी कर्मचारी आहेत.
पीडित तरुणीची आरोपीशी होती ओळख : अजितकुमार यादव आणि पीडित एकमेकांना ओळखत असल्याचं चेंबूर पोलिसांनी सांगितलं. या घटनेच्या दिवशी यादवनं त्याचा मित्र प्रभाकर यादव (30) याला त्याच्या घरी बोलावलं होतं. अजित यादव याच कुटुंब बाहेर गेलं होतं. त्यामुळे त्यानं आपल्या मित्राला त्याच्या फ्लॅटवर बोलावलं. काही वेळानंतर, पीडित मुलगी स्वयंपाकासाठी काही साहित्य घेण्यासाठी अजित यादव याच्याकडे आली. त्यानंतर अजितनं तिला स्प्राईटची बाटली देऊ केली. ती बॉटल अगोदरच ओपन केलेली होती. काही घोट थंड पेय घेतल्यानंतर पीडित तरुणी बेशुद्ध पडली. त्यानंतर दोन्ही नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला. साडेबारा वाजण्याच्या सुमारास शुद्धीवर आल्यावर तिच्यावर बलात्कार झाल्याचं तिला समजलं. ती तिच्या फ्लॅटच्या दिशेनं धावली. त्यानंतर तिनं इमारतीत राहणाऱ्या तिच्या काही जवळच्या मित्रांना या घटनेबद्दल माहिती दिली, असं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.
आरोपींना 20 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी : पीडित तरुणीनं 16 नोव्हेंबरला पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर या दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. दोघांनाही पोलिसांनी एकाच दिवशी अटक केली. अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर केलं असता त्यांना 20 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीच्या घरातून कोल्ड ड्रिंकचे नमुने घेतले असून ते फॉरेन्सिक विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून वैद्यकीय अहवाल येणे अजून बाकी आहे. हा अहवाल नंतर पुरावा म्हणून आरोपपत्रात जोडला जाईल, अशी माहिती चेंबूर पोलिसांनी दिलीय. दोन्ही आरोपीविरोधात भारतीय दंड संविधान कलम 376, 376 (डी), 328, 34 यासह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
हेही वाचा :