मुंबई - मासेमारी हा कोळी समाजाचा परंपरागत व्यवसाय आहे. पण, हा व्यवसायच आता धोक्यात आहे. त्यामुळे कोळी समाजावर बेरोजगारीची वेळ आली आहे. पण, सरकार याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे वरळी कोळी वाड्यातील मच्छीमारांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
दक्षिण मुंबईत दोन हजारांपेक्षा जास्त कोळी समाज राहतो. त्यांचा मुख्य व्यवसाय मासेमारी आहे. पण, मासेमारी कमी झाल्याने कोळी समाजाच्या उपजिवीकेवरच संकट कोसळण्याची भीती उत्पन्न झाली आहे. नॅशनल फिशरीज असोसिएशनने सरकारकडे अनेकदा पत्रव्यवहार केला. पण, सरकार दाद देत नाही. उलट १२ कुटुंबे मासेमारी करतात अशी चुकीची माहिती सादर केली जाते. प्रत्यक्षात ५५० बोटी मासेमारी करतात असा आरोप कोळी समाजाने केला आहे. निवडणुकीत बहिष्कार केल्याने शिवसेनेला याचा फटका बसू शकतो असे बोलले जात आहे. कारण, कोळी समाज हा शिवसेनेचा पारंपरिक मतदार आहे.
समुद्रात मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. त्यामुळे मासेमारी करताना चिखलच जाळ्यात अडकतो. समुद्रात दूरवर जाऊनही मासे सापडत नाहीत. सध्याच्या मोसमात 'जवळा' नावाचा मासा सापडतो. पण, हा मासाच मिळणे बंद झाले आहे. एवढेच नव्हे तर माशांचे प्रजनन स्थान धोक्यात आले असल्याचे मच्छीमारांची तक्रार आहे.