मुंबई - मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडून जानेवारी 2021 ते एप्रिल 2021 या 4 महिन्यांच्या कालखंडामध्ये सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात 777 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. आतापर्यंत यामध्ये केवळ 84 गुन्ह्यांचा सायबर पोलिसांनी छडा लावलेला आहे. सायबर पोलिसांकडून केवळ 10 टक्के प्रकरणात छडा लावला असताना या उलट विशेष बाब म्हणजे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या 4 महिन्यात आर्थिक फसवणुकीच्या संदर्भात 44 गुन्हे दाखल करत 44 प्रकरणात आरोपींना अटक करून 100 टक्के कारवाई केली आहे .
सायबर गुन्हे 777 छडा 84 प्रकरणात
मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये संगणकाच्या सोर्स कोड सोबत छेडछाड करण्याच्या संदर्भात एप्रिल महिन्यात 2 गुन्हे नोंदवले असून, सायबर अटॅक प्रकरणी 1 गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. इंटरनेटवर फिशिंग- हॅकिंग संदर्भात 4 गुन्हे नोंदवण्यात आले असून बनावट, अश्लील ई-मेल, एसएमएस पाठवल्याप्रकरणी 78 गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत. सोशल माध्यमांवर बनावट प्रोफाइल बनवून बदनामी करण्याच्या संदर्भात 18 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्वाधिक गुन्हे हे क्रेडिट कार्ड फसवणुकीच्या संदर्भात नोंदविण्यात आले असून आतापर्यंत 181 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. इतर प्रकरणांमध्ये गेल्या 4 महिन्यात 493 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
आर्थिक गुन्हे शाखेची 100 टक्के चोख कारवाई
मुंबई शहरात जानेवारी 2021 ते एप्रिल 2021 या 4 महिन्यांच्या कालखंडामध्ये तब्बल 1 हजार 193 कोटी 92 लाख 83 हजार 763 रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याचा तपास केलेला आहे. जानेवारी 2021 ते एप्रिल 2021 या चार महिन्याच्या कालखंडामध्ये आर्थिक गुन्ह्यांच्या संदर्भात 44 गुन्हे नोंदविण्यात आले असून या सर्व 44 गुन्ह्यांचा 100% तपास लावत सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. एप्रिल महिन्यामध्ये आर्थिक फसवणुकीच्या संदर्भात आर्थिक गुन्हे शाखेने 14 गुन्हे दाखल करून 14 गुन्ह्यांचा तपास पूर्ण केलेला आहे.