मुंबई - पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांसोबत झालेल्या हिंसाचाराविरोधात मुंबईतील केईएम, नायर, सायन, सेंट जॉर्ज येथील डॉक्टरांनी संप पुकारत निषेध व्यक्त केला आहे. डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात लवकरात लवकर कारवाई व्हावी, अशी मागणी या डॉक्टरांनी केली आहे.
पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांसोबत झालेल्या हिंसाचारानंतर देशभरातील डॉक्टरांनी या घटनेचा निषेध करत संप पुकारला. तर दिल्ली मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी अत्यावश्यक सेवांना बाधा न पोहचता संप करण्याचे आवाहन डॉक्टरांना केले आहे.
रविवारी रात्री उशीरा केलेल्या आवाहनात म्हटले आहे, की सर्व रूग्णालये, नर्सिंग होम्स आणि रुग्णालयातील रुटीन सेवा बंद राहतील. डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून कायदा बनविण्याची गरज आहे. रुग्णालयांना सुरक्षा ठिकाणांच्या यादीत समाविष्ट करुन डॉक्टरांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी सरकारने घ्यावी, अशी मागणी संपकरी डॉक्टरांनी केली आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या या आवाहनानंतर देशातील ५ लाख डॉक्टरांनी या संपात सहभाग घेतला आहे. दरम्यान, रुग्णांना याचा मोठा फटका बसणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सरकारने रुग्णांचे जीव टांगणीवर न ठेवता लवकरात लवकर या डॉक्टरांच्या मागणीवर तोडगा काढावा, असे बोलले जात आहे. तर पुढील २४ तास हा संप राहणार आहे. यास सरकार कशाप्रकारे दाद देईल हे पाहून पुढची दिशा ठरवणार असल्याचे यावेळी डॉक्टरांनी सांगितले.