मुंबई - सोमवारपासून मुंबईत शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, ज्या विद्यार्थ्यांचा जेवणाचा घरचा डबा डब्बेवाले पोहचवत होते, अशा विद्यार्थ्यांना मात्र घरचा डब्बा खाता येणार नाही. कारण, मुंबई पोलिसांनी शाळांमध्ये डब्बेवाल्यांसाठी लागू केलेली बंदी अजूनही उठवण्यात आली नाही. त्यामुळे नाराज डबेवाला संघटनांच्या सदस्यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त (एफडीए) पल्लवी दराडे यांची भेट घेत निवेदन देऊन बंदी उठवण्याची मागणी केली.
सुरक्षेच्या कारणास्तव मुबंईच्या डबेवाल्यांना शाळेत डबा पोहचविण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. या विरोधात डबेवाले संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे दाद मागीतली होती. मात्र, अजूनही बंदी कायम आहे. या पाश्वभुमीवर मुंबई डबेवाला असोशिएशनच्या शिष्टमंडळाने एफडीए आयुक्त पल्लवी दराडे यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात सुभाष तळेकर, विठ्ठल सावंत, अनंथा तळेकर सहभागी झाले होते.
ज्या विद्यार्थ्यांना घरचा डबा खायचा आहे. तो त्यांना मिळावा म्हणुन डबेवाल्यांना शाळांमध्ये जाण्यास बंदी करू नये. तसेच या प्रश्नावर बैठक आयोजित करण्याची मागणी संघटनेने केली. मुलांनी पहिली पसंती घरच्या जेवणाला दिली पाहीजे. कारण घरचे जेवण हे स्वच्छ, ताजे, चवदार, पौष्टिक, सकस आणि आर्थीक दृष्ट्या परवडणारे असते, असा सकारात्मक प्रतिसाद आयुक्तांनी दिल्याचे असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले.
या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी पोलीस आयुक्त, शाळा प्रशासन, एफडीए आयुक्त आणि डबेवाला संघटनेची बैठक आयोजित करण्याची मागणी केली. आमदार आशिष शेलार यांनी याबाबत मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून मार्ग काढण्यात यावा अशी विनंती केली होती. आशिष शेलार आता शालेय शिक्षण मंत्री झाले आहेत. त्यामुळे हा प्रश्न काही दिवसात सुटेल व शाळेचे डबे पुन्हा चालू होतील, अशी आशा आम्हाला आहे, असे मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले.