मुंबई Mumbai Crime : अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरळी युनिटकडून मिळालेल्या माहितीनुसार, युनिट प्रभारी संदीप काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे आणि त्यांचे पथक गस्त घालत होते. गस्त घालत हे पथक माहीमजवळ पोहोचले. तेव्हा रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक एकजवळ फूटपाथवर एक व्यक्ती उभा होता. त्याची देहबोली काहीशी संशयास्पद वाटत होती. त्यामुळं अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी तेथे वाहन थांबवून सदरील व्यक्तीची झडती घेतली. तेव्हा त्याच्याकड असलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत एमडी ड्रग्ज आढळून आले. त्यामुळं पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरळी कार्यालयात आणले.
आरोपीला अटक : बेनेडिक्ट फ्रान्सिस गॉडगिफ्ट सायप्रियन उर्फ डिंकू (वय 37) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. यासंदर्भात अधिक माहिती देत एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, आरोपी डिंकूकडून जप्त केलेल्या पावडरचा एक छोटा नमुना एका पॅकेटमध्ये घेण्यात आला होता आणि उर्वरित पावडर दुसऱ्या पॅकेटमध्ये ठेवून सीलबंद करण्यात आले होते. या पावडरची तपासणी केल्यावर ते एमडी ड्रग्ज असल्याचं निष्पन्न झालं.
पुढील तपास सुरू : अमली पदार्थ विरोधी पथकानं डिंकूकडून एकूण 250 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले असून त्याची किंमत 50 लाख रुपये आहे. आरोपी डिंकू हा कृष्णा अपार्टमेंट, प्रगती नगर, नालासोपारा (पूर्व) येथे राहतो. पोलीस डिंकूचे पूर्वीचे रेकॉर्ड तपासत असून यासोबतच डिंकूला हे एमडी ड्रग्ज कोठून मिळाले याचाही तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, रविवारी (31 डिसेंबर) अमली पदार्थ विरोधी पथकानं डिंकूला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 3 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आरोपीचे वकील युसूफ अन्सारी यांचे म्हणणे आहे की, आरोपीकडून जप्त करण्यात आलेले ड्रग्ज व्यावसायिक प्रमाणात नव्हते. शनिवारी रात्री माहीम परिसरातून 50 लाख रुपयांच्या एमडी ड्रग्जसह एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव यांनी दिलीय.
हेही वाचा -