मुंबई : उद्यान एक्सप्रेसमध्ये प्रवासी महिलेची बॅग जबरदस्तीने खेचणाऱ्या व तिला गाडीतून ढकलून देणाऱ्या आरोपीला गुन्हा दाखल करण्यापूर्वीच रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव मनोज चौधरी (वय वर्ष 32) आहे. ही कारवाई दादर रेल्वे पोलिसांनी केली आहे. 6 ऑगस्टला दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास एक महिला प्रवासी ही पुणे रेल्वे स्टेशन येथून उद्यान एक्सप्रेसच्या गार्ड बाजूकडील महिलांच्या जनरल डब्यामधून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने प्रवास करीत होती. ही एक्स्प्रेस ही रात्री साडेआठ वाजता दादर रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक ६ वर आली. तेव्हा ही घटना घडली.
डब्याच्या दरवाज्यातून बाहेर ढकलले : या रेल्वेतील प्रवास करणाऱ्या इतर महिला प्रवासी फलाटावर उतरून गेल्या. त्यानंतर गाडी सुरू होताच महिलांच्या डब्यात आरोपीने महिलेचा विनयभंग करीत तिच्याकडील बॅग जबरदस्तीने खेचून घेतली. त्यावेळी या महिला प्रवाशाने आरोपीला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्या रागात आरोपीने तक्रारदार महिलेला जीवे मारण्याच्या उद्देशाने डब्याच्या दरवाज्यातून बाहेर ढकलून दिले, अशी माहिती मिळाली आहे.
सीसीटीव्ही फूटेज पाहून आरोपी ताब्यात : वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दादर रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी या गुन्ह्यातील जखमी तक्रारदार महिला प्रवाशाकडे चौकशी केली. तसेच दादर रेल्वे स्टेशनचे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे सीसीटीव्ही फूटेज पाहून घटनेतील संशयित आरोपीला गुन्हा दाखल होण्यापूर्वीच ताब्यात घेतले आहे. या घटनेच्या अनुषंगाने महिला प्रवाशाने 7 ऑगस्ट रोजी दादर रेल्वे पोलीस ठाणे येथे तक्रार दिली आहे. तक्रारीन्वये दादर रेल्वे पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 307, 394, 354 सह भारतीय रेल्वे कायदा कलम 150 (१) (ई), 153, 137, 147, 162 अन्वये दाखल करण्यात आला. यानंतर आरोपीस तत्काळ अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास दादर रेल्वे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे करीत आहेत.
हेही वाचा :