मुंबई : मुंबई पोलिसांनी दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याची व्हिडिओ क्लिप समाज माध्यमांवर पोस्ट केल्याबद्दल अटक केली आहे, असे एका अधिकाऱ्याने आज सांगितले. येथील कुलाबा परिसरातील दोन विद्यार्थ्यांना सोमवारी रात्री उशिरा प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली. त्यानंतर समज देऊन त्यांना सोडण्यात आले, असे त्यांनी सांगितले. कुलाबा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या किशोरवयीन विद्यार्थ्यांनी त्यांच्या सोशल मीडिया स्टेटसला पाकिस्तानच्या ध्वजाची व्हिडिओ क्लिप पोस्ट केली होती.
आक्षेपार्ह व्हिडिओ : कुलाबा येथील एका व्यावसायिकाने ते पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. त्याने दावा केला की, परिसरातील दोन रहिवाशांनी पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाविषयी स्टोरी त्यांच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केल्या होत्या. त्यामुळे सामाजिक वातावरणावर परिणाम होऊ शकतो. या तक्रारीच्या आधारे दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी रात्री उशिरा या विद्यार्थ्यांचा शोध घेतला. त्यांना कुलाबा पोलीस ठाण्यात आणले. सीआरपीसी कलम 151 (3) अंतर्गत करण्यात आलेली अटक प्रतिबंधात्मक स्वरूपाची होती, असे अधिकाऱ्याने सांगितले. पोलीस आणि एटीएसने दोन विद्यार्थ्यांची चौकशी केली. तेव्हा तो आक्षेपार्ह व्हिडिओ त्यांच्या मित्राने त्यांना फॉरवर्ड केलेला आहे, असे समजले. हा आक्षेपार्ह व्हिडिओ त्यांच्या फोनमधून काढून टाकण्यात आला, असे अधिकाऱ्याने सांगितले.
आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यावरून वाद झाल्याच्या घटना : मागील काही दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये देखील अशीच घटना घडली होती. आक्षेपार्ह व्हाट्सअप स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून तीन युवकांना बेदम मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडीओ चित्रीकरण करून सोशल मीडियावर अपलोड केला होता. ही घटना 10 जून 2023 रोजी घडली होती. जून महिन्यात कोल्हापुरातील काही तरुणांनी जातीय तेढ निर्माण होणारे स्टेटस ठेवले होते. त्यामुळेही वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी संबंधित तरुणांवर कारवाई करा, अशी मागणी करत हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले होते. या प्रकारामुळे कोल्हापूर शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली होती.
हेही वाचा :