मुंबई Mumbai Crime News : घड्याळयाचा वादातून मोहम्मद नायाफ इम्तियाज बलोच या 26 वर्षांच्या जिम ट्रेनरवर चाकूनं प्राणघातक हल्ला करणार्या आरोपीस ओशिवरा पोलिसांनी अटक केलीय. मेहबूब मुक्तार अहमद (वय 24) असं या मारेकर्याचं नाव आहे. हल्ला केल्यानंतर तो उत्तर प्रदेशात पळून गेला होता. त्याला उत्तर प्रदेशातील त्याच्या गावातून पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील चौकशीसाठी मुंबईत आणलं जात असल्याचं पोलिसांनी सागितलंय.
नेमकं काय घडलं होतं : मोहम्मद नायाफ हा गोरेगाव इथं राहत असून एका जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करतो. याच जिममध्ये मेहबूब हा नियमित येत होता. त्यामुळं त्यांची चांगली मैत्री झाली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या घड्याळ्याची अदलाबदल केली होती. मात्र मेहबूबला ते घड्याळ आवडलं नाही. त्यामुळं त्यानं मोहम्मद नायाफकडे त्याच्या घड्याळाची मागणी केली होती. त्यानं ते घड्याळ परत केलं नाही म्हणून त्यानं त्याच्याकडे घड्याळाच्या पैशांची मागणी केली. मात्र त्यानं पैसे देण्यासही नकार दिला. त्यामुळं 6 डिसेंबरला तो जिममध्ये गेला आणि त्यानं मोहम्मद नायाफवर चाकूनं वार केले होते. या हल्ल्यात त्याच्या गालावर आणि छातीवर गंभीर दुखापत झाली होती. या हल्ल्यानंतर मेहबूब तिथून पळून गेला होता.
आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक : या घटनेची माहिती मिळताच ओशिवरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्या मोहम्मद नायाफला कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मेहबूबविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला होता. त्याचा शोध सुरु असताना तो उत्तर प्रदेशला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन पाटील यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सुनिल खैरे, भंडारे, चव्हाण यांनी आरोपी मेहबूब अहमद याला उत्तर प्रदेशातून शिताफीनं अटक केली. अटकेनंतर त्याला तेथील स्थानिक न्यायालयानं सहा दिवसांची ट्रॉन्झिंट रिमांड दिलीय. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणलं जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
हेही वाचा :