मुंबई Mumbai Crime : तीन वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात ड्रग्ज माफीयाला अमली पदार्थ विरोधी सेल (ANC) घाटकोपर युनिटनं ओडिसातून अटक केली आहे. लक्ष्मीकांत रामप्रधान उर्फ लक्ष्मीभाई आणि विद्याधर वृंदावन प्रधान अशी अटक करण्यात आलेल्या दोन कुख्यात आरोपींची नावं आहेत. कुख्यात ड्रग्ज माफीया लक्ष्मीभाई ओडिसात नाव बदलून राहत होतो. मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला अटक केल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलीस अधिकारी लता सुतार यांनी दिली आहे.
साडेतीन कोटींचा गांजा केला जप्त : अमली पदार्थ विरोधी पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपरच्या युनिटनं डिसेंबर 2021 मध्ये विक्रोळी महामार्गावर एका टेम्पोसह तीन आरोपींना अटक केली होती. पोलिसांनी यावेळी अंदाजे 3.5 कोटी रुपयांचा गांजा जप्त केला होता. हे सर्व आरोपी अद्याप न्यायालयीन कोठडीत असून दोन आरोपी फरार आहेत.
नाव बदलून लपून राहात होते आरोपी : अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव यांनी सांगितलं की, या प्रकरणाच्या तपासात असं समोर आलं आहे की, दोन्ही आरोपी ओडिसा इथून ड्रग्ज आणायचे. हे ड्रग्ज ते मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये विकायचे. ओडीसातून गांजा आणून मुंबईत विकणाऱ्या लक्ष्मीकांत रामप्रधान उर्फ लक्ष्मीभाई आणि विद्याधर वृंदावन प्रधान या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांपासून वाचण्यासाठी दोन्ही आरोपी ओडिसा, तेलंगणा आणि हैदराबाद इथं लपून बसले होते, अशी माहितीही यावेळी त्यांनी दिली.
लक्ष्मीभाई कुख्यात ड्रग्ज माफिया : घाटकोपर युनिट प्रभारी लता सुतार यांना या आरोपींबद्दल माहिती मिळाली होती. त्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकाचं घाटकोपर युनिट ओडिसा इथं पोहोचलं. "पोलिसांनी दोन्ही आरोपींना गोलंथरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक केली. याप्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकानं आतापर्यंत एकूण पाच आरोपींना अटक केली आहे. लक्ष्मीभाईंवर विविध पोलीस ठाण्यात एकूण 4 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये 2 NDPS आणि 2 शस्त्रास्त्र कायद्याचे गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. लक्ष्मीभाईचा सहकारी विद्याधर वृंदावन प्रधान याच्यावरही 3 गुन्हे दाखल आहेत" अशी माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी पोलीस निरीक्षक लता सुतार यांनी दिली.
हेही वाचा :