मुंबई : गेल्या काही दिवसात मुंबईतील कोरोनाचा प्रसार आटोक्यात आला आहे. गेले तीन दिवस एक आकडी रुग्णांची नोंद होत आहे. आज केवळ २ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. अडीच वर्षांपूर्वी कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच इतक्या कमी रुग्णांची नोंद झाली आहे. आज शून्य मृत्यूची नोंद झाली असून अडीच वर्षात १७९ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मागील काही दिवसात सक्रिय रुग्णांची संख्या वाढली होती. त्यातही घट होऊन ७१ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे.
कोरोनाचे २ नवे रुग्ण : मुंबईत १ डिसेंबरला २९४२ चाचण्या करण्यात आल्या. त्यात २ रुग्णांची नोंद झाली. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. १० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ५४ हजार ९११ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ३५ हजार ०९६ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ७४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ७१ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.३ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ७४,७६१ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.००१ टक्के इतका आहे.
रुग्णसंख्येत उतार सुरू : मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून २३ जूनला २४७९ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊ लागली आहे.१७ नोव्हेंबरला २६, १८ नोव्हेंबरला १३, १९ नोव्हेंबरला ८, २० नोव्हेंबरला १५, २१ नोव्हेंबरला १०, २२ नोव्हेंबरला १२, २३ नोव्हेंबरला १४, २४ नोव्हेंबरला १०, २५ नोव्हेंबरला १८, २६ नोव्हेंबरला १५, २७ नोव्हेंबरला १६, २८ नोव्हेंबरला ६, २९ नोव्हेंबरला ६, ३० नोव्हेंबरला ८, १ डिसेंबरला २ रुग्णांची नोंद झाली आहे.
१७९ वेळा शून्य मृत्यूची नोंद : मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा, जून महिन्यात ७ वेळा, जुलै महिन्यात ६ वेळा, ऑगस्ट महिन्यात ७ वेळा, सप्टेंबर महिन्यात ११ वेळा, ऑक्टोबर महिन्यात २४ वेळा, नोव्हेंबर महिन्यात २४ वेळा, डिसेंबर महिन्यात १ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १७९ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.