मुंबई - संजय निरुपम यांच्या मनमानी कारभारावर ट्विटरवर जाहीर नाराजी व्यक्त करून मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेसमध्ये खळबळ उडवून दिली होती. परंतु आमच्या दोघांत दिलजमाई आहे. आम्ही एकत्र राहू आणि एकत्र आहोत, असे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी मुंबईत एमएमआरडीएच्या मैदानात राहुल गांधी यांच्या सभेची पूर्व तयारीची पाहणी करताना म्हटले.
संजय निरुपम यांच्यावर मुंबईतील काँग्रेस नेते नाराज असल्याने मुंबई काँग्रेस अडगळीत पडली होती. निरुपम यांच्यावर दिवंगत नेते गुरुदास कामत यांनी आधी वरिष्ठांकडे तक्रार केली होती. त्यानंतर माजी खासदार प्रिया दत्त यांनी आपण निवडणुकीतून बाहेर पडत आहे, असे जाहीर करून नाराजी व्यक्त केली होती. पण संजय निरुपम एक लढाऊ नेते असल्याने दिल्लीतून त्याना अभय देण्यात आले आहे. नाराज मुंबई काँग्रेस नेत्यांची नाराजी दूर करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वांनी एकत्र येऊन पक्षाचे काम करावे, असे वरिष्ठांचे निर्देश असल्याने संजय निरुपम व मिलिंद देवरा यांनी आपापसातील मतभेद दूर करून एकत्र आहोत असा कार्यकर्त्याना संदेश दिला.
मुंबईत लोकसभेच्या ६ मतदार संघ आहेत. २०१४ ला मुंबईतून काँग्रेसची एकही जागा निवडून आली नव्हती. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सर्व नेते एकत्र पूर्ण ताकदीने उतरले नाही तर काँग्रेस कार्यकत्याना चुकीचा संदेश जाईल. तसेच पक्षाचे मोठे नुकसान होईल. सध्या मुंबईतील ६ ही लोकसभा मतदार संघ शिवसेना व भाजपा यांचे बालेकिल्ले झाले असून तो भेदने काँग्रेसला सध्या तरी कठीण जाईल असे राजकीय विश्लेषक म्हणत आहेत. त्यातच काँग्रेसची मदार राहुल गांधी यांच्यावर असल्याने राहुल गांधी एमएमआरडीए च्या मैदानावर १ मार्च ला जाहीर सभेत काय बोलतात यावर मुंबई करांचे लक्ष आहे.