मुंबई - भारतीय संविधान आणि त्याच्या मुल्यांचा जागर करण्यासाठी मुंबई प्रदेश काँग्रेसने आज संविधान जागर, तसेच 'संविधान से स्वाभिमान है' या अभियानाची सुरुवात केली. हे अभियान 26 जानेवारी 2021 पर्यंत चालवले जाणार असल्याची माहिती मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाचे संविधान लिहिले. तो संविधान दिवस आम्हाला आमच्या काही नेत्यांच्या निधनामुळे मोठ्या प्रमाणात साजरा करता आला नाही. म्हणून आज आम्ही या संविधान जागर अभियानाची सुरुवात करत आहोत. संविधानाचा जागर मुंबईतील घराघरांमध्ये केला जावा यासाठीची ही मोहीम आम्ही राबवत आहोत. ज्या संविधानाने धर्मस्वातंत्र्य, व्यक्तीस्वातंत्र्य आणि शिक्षणाचा अधिकार दिला, त्या संविधानातील मुल्यांची देशातील प्रत्येक नागरिकांना माहिती मिळणे आवश्यक आहे. म्हणूनच हे अभियान आजपासून सुरू केले जाणार असून, ते 26 जानेवारी 2021 पर्यंत मुंबईतील प्रत्येक विभाग, प्रभागात, चौकात राबवले जाणार आहे. यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.
संविधानामुळे देशाची एकता अबाधित - गायकवाड
भारतीय संविधानामुळे आज देश एकत्र राहिला. देशाचा विकास झाला. देशाची एकता अबाधित राहिली. त्याच संविधानाबद्दल जनमानसांमध्ये जागरुकता आणण्यासाठी संविधानाचा जागर आपण करणार आहे. आपल्या देशात वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत, तरी आपण सर्वप्रथम भारतीय आहोत. ही आपली घटना आपल्याला सांगते. कितीही मोठा मंत्री, नेता असला तरी तो संविधानाच्या वर कधीच नसतो, आणि देशापेक्षा कोणी मोठा नाही. हे मुल्य आपल्याला संविधानाने दिले आहेत, असे गायकवाड म्हणाले.
या कार्यक्रमाला काँग्रेसचे उपाध्यक्ष विरेंद्र बक्षी, काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, अनुसूचित जाती विभागाचे कचरू यादव, महिला काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर अजंता यादव आदी अनेक नेते उपस्थित होते.
हेही वाचा - अजान स्पर्धेशी माझा काहीही संबंध नाही, मी स्पर्धेचे आयोजन केलेले नाही - पांडुरंग सपकाळ