मुंबई Mumbai Builder Kidnapped : दक्षिण मुंबईतील एका बिल्डरचं अपहरण करुन दहा कोटींची खंडणी मागणाऱ्या कुख्यात गँगस्टरच्या भायखळा पोलिसांसह गुन्हे शाखेनं मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी शुक्रवारी बिल्डरच्या मुलानं भायखळा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन रात्री दहा वाजण्याच्या सुमारास भारतीय दंड विधान कलम 364 अ, 384 आणि 120 ब अन्वये तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी मुख्य आरोपी इलियाज बचकाना याला गोवंडीतून गुन्हे शाखेनं अटक केलं आहे. बांधकाम व्यावसायिकाच्या घरी खंडणी मागण्यास गेलेल्या सोनू आणि आलम या दोघांनाही भायखळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
बिल्डरच्या मुलानं दिली तक्रार : बांधकाम व्यावसायिकाच्या मुलानं दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलंय की, माझ्या वडिलांना त्यांच्या व्यावसायिक भागीदारानं 23 नोव्हेंबरला माझगाव सर्कल इथं बोलावलं होतं. यानंतर दोघंही माझगाव सर्कल इथं बोलत असताना त्याठिकाणी एक लाल रंगाची मारुती सुझुकी चार चाकी गाडी उभी राहिली. त्या कारमधून दोन व्यक्ती उतरले. यावेळी त्यांनी माझ्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून 'गाडी मे बैठे हुए आदमी आपको बुला रहे है' असं सांगितल्यानंतर माझे वडील गाडी जवळ जाऊन गाडीत बसले. त्यानंतर गाडी माझगाव सर्कलच्या दिशेनं निघून गेली. माझे वडील बराच वेळ होऊनही पुन्हा न परतल्यानं ज्या पार्टनरनं माझ्या वडिलांना बोलावलं होतं त्यांना फोन केला असता त्यांच्या मोबाईलची रिंग वाजली परंतु, त्यांनी फोन उचलला नाही. तसंच वडिलांनाही दोन चार वेळा फोन केला असता, त्यांचा मोबाईल बंद होता. त्यामुळं आम्हाला काळजी वाटू लागल्यानं आजूबाजूच्या परिसरात त्यांचा शोध घेतला असता, ते मिळून आले नाहीत.
व्हाट्सअप कॉलद्वारे मागितले पैसे : रात्री एक वाजून वीस मिनिटांच्या आसपास माझ्या मोबाईलवर व्हाट्सअप कॉल आला. हा फोन वडिलांच्या भागिदारानं उचलला असता, समोरच्या व्यक्तिनं त्याचं नाव इलियाज बचकाना असं सांगून 'मै तेरे बाप को उठा लिया है, मेरा पैसा और घडी मिली नही' असं म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर पुन्हा 1.25 वाजताच्या आसपास दुसऱ्यांदा त्याच मोबाईल क्रमांकावरुन व्हाट्सअप कॉल आला असता, तो सुद्धा वडिलांच्या भागिदारानं स्पीकरवर ठेवून रिसिव्ह केला. तो कॉल आम्ही दुसऱ्या मोबाईलवरुन रेकॉर्डिंग केला. समोरच्या कॉलर व्यक्तिनं खंडणी अथवा हप्ता मागत नसून त्याला त्याचे पैसे मिळाल्याशिवाय माझ्या वडिलांना सोडणार नाही, असं म्हणून दहा कोटी रुपयांची मागणी केली. तसंच सोनू या व्यक्तीला फोन करुन वडिलांचा व्हिडिओ दाखवला असल्याचं तक्रारदार मुलानं पोलिसांना सांगितलंय.
पोलिसांकडून बिल्डरची सुटका : यासंदर्भात तक्रार दाखल होताच पोलिसांनी शोध घेत बिल्डरची सुटका केल्यानंतर बिल्डरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसंच याप्रकरणी पोलिसांनी बचकाना आणि त्याला मदत करणाऱ्या एका साथीदाराला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलीस आणखी एका साथीदाराचा शोध घेत असल्याचंही यावेळी सूत्रांनी सांगितलं आहे. विकासकाचे अपहरण करून मानखुर्द तेथे बांधून ठेवलेले होते. मानखुर्द येथून विकासाचे सुखरूप सुटका करून आरोपी इलियाज बचकाना आणि नौशाद या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त तिलक कुमार रौशन यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.
हेही वाचा :