मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पादचारी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात ६ जणांचा मृत्यू झाला तर ३६ जण जखमी झाले आहेत. मात्र याच सोयरसुतक न बाळगता सर्वच लोकप्रतिनिधींनी आरोप प्रत्यारोप सुरू केले. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज दुर्घटनास्थळी सामाजिक संस्थांनी शांततापूर्व निषेध नोंदवला.
पादचारी पूल कोसळल्याच्या घटनेमुळे पुन्हा एकदा मुंबई महापालिका प्रशासन सामान्य नागरिकांना सोयी सुविधा देण्यास कमी पडली आहे. याच पार्श्वभूमीवर आज सर्वोदय भारत या संस्थेच्यावतीने निषेध नोंदवण्यात आला. नागरिकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी आता तरी जागे व्हावे, अन्यथा खुर्ची खाली करा, असा संदेश यावेळी निदर्शनकर्त्यांकडून देण्यात आला.
याप्रकरणी आज पालिकेकडून २ अभियंत्याना निलंबित करण्यात आले आहे. सोबतच कंत्राटदार मे. आरपीएस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.