मुंबई- शहरात अडकलेल्या मजुरांची त्यांच्या मूळ गावी जाण्याची व्यवस्था राज्य शासनातर्फे करण्यात आली आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून विशेष ट्रेन चालवल्या जात आहेत. या मजुरांना बृहन्मुंबई महापालिकेतर्फे अन्नाचे पाकिट, मास्क तसेच पाण्याच्या बॉटल वितरित करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून काल रविवारी सकाळी व सायंकाळी प्रत्येकी १२०० याप्रमाणे एकूण २ हजार ४०० मजुरांना अन्नाची पाकिटे वितरित करण्यात आली. तसेच कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस येथेही सकाळी व सायंकाळी प्रत्येकी १२०० याप्रमाणे एकूण ३ हजार ६०० मजुरांना अन्नाची पाकिटे, मास्क, पाण्याच्या बॉटल वितरित करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून जाणाऱ्या मजुरांना अन्न पाकिटांचे वितरण 'ए' विभाग कार्यालयातर्फे, तर कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून जाणाऱ्या मजुरांना अन्न पाकिटांचे वितरण 'एल' विभाग कार्यालयातर्फे करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे दादर टर्मिनस येथून जाणाऱ्या मजुरांना अन्न पाकिटांचे वितरण जी/ उत्तर विभाग कार्यालयातर्फे, तर मुंबई सेंट्रल येथून जाणाऱ्या मजुरांना अन्न पाकिटांचे वितरण 'ई' विभाग कार्यालयातर्फे करण्यात येत आहे.