मुंबई Mumbai Block News : मध्य रेल्वेकडून डेडिकेटेड कॉरिडॉर काम सुरू केलं जातंय. त्यामुळे आज 11 सप्टेंबरपासून रोज रात्री महत्त्वाचा ब्लॉक घेतला जाईल, असं रेल्वेनं जाहीर केलंय. रात्री साडेबारा ते सकाळी साडेपाचपर्यंत पनवेल यार्डमध्ये हा ब्लॉक घेण्यात येतोय. त्यामुळं 'सीएसएमटी ते पनवेल, पनवेल ते ठाणे' अशा रात्री काही पहाटेच्या लोकल फेऱ्या रद्द झालेल्या आहेत.
22 दिवस ब्लॉक : मध्य रेल्वेकडून अत्यंत महत्त्वाच्या डेडिकेटेड कॅरिडॉर कामकाजासाठी 11 सप्टेंबरपासून तो 2 ऑक्टोबरपर्यंत तब्बल 22 दिवस हा ब्लॉक घेण्यात येत आहे. यामुळे रात्रीच्या उशिरा धावणाऱ्या आणि पहाटेच्या काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल यार्डमध्ये अत्यंत महत्वपूर्ण काम केलं जाणार आहे. जवाहरलाल नेहरू बंदर अर्थात जेएनपीटीपासून ते दिल्लीच्या नोएडा या तसंच दादरी रेल्वे मार्गापर्यंत एक मोठी मार्गिका उभारली जातेय. म्हणूनच पनवेल स्टेशन यार्डमध्ये मोठं काम सुरूयं. त्यामुळंच मुंबई लोकलच्या पार्किंग नियोजनात बदल करण्यात आलाय. त्याचा परिणाम हार्बर मार्गावरील काही लोकल फेऱ्या रद्द होण्यात झालेला आहे.
रात्रीच्या लोकलबाबत : पनवेल यार्डमध्ये रात्री साडेबारा ते सकाळी साडेपाच पर्यंत हा ब्लॉक असेल. त्यामुळं छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून पनवेलकडे धावणारी शेवटची लोकल ही 10 वाजून 58 मिनिटांनी असणार आहे. तसंच ठाण्यावरून शेवटची पनवेलकडे जाणारी लोकल 11 वाजून 32 मिनिटांनी असेल. तर पनवेलकडून ठाण्याला जाणारी शेवटची लोकल रात्री 10 वाजून 15 मिनिटांनी असेल.
पहाटेच्या लोकलबाबत : पहाटे 4 वाजून 32 मिनिटांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल ही पहिली लोकल धावणार आहे. तर पनवेलवरून सीएसएमटीकरिता 5 वाजून 40 मिनिटांनी पहिली लोकल धावणार आहे. ठाण्यावरून पनवेलकरता पहिली लोकल 6 वाजून वीस मिनिटांनी तर पनवेलवरून ठाण्याकरता 6 वाजून तेरा मिनिटांनी धावणार आहे. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मानसपुरे यांनी सांगितलं की, रेल्वे ब्लॉकमुळं सीएसएमटी ते पनवेल, पनवेल ते सीएसएमटी, ठाणे ते पनवेल, नेरूर पनवेल ते ठाणे अशा काही पहाटे आणि काही रात्रीच्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.
हेही वाचा :