मुंबई - पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येमागे आरएसएस असल्याचा आरोप करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी, सिपीएम नेते सीताराम येचुरी यांच्या विरोधात माझगाव न्यायालयात दाखल याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. या दरम्यान न्यायालयात राहुल गांधी व सीताराम येचुरी हे दोघेही सुनावलीला हजर होते.
गुरुवारच्या सुनावणीत राहुल गांधी व सीताराम येचुरी यांना 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे. न्यायालयाबाहेर आल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी म्हटले की, आज मला न्यायालयात हजर व्हायचे होते म्हणून मी आलो आहे. मात्र, माझ्यावरील आरोपांसंदर्भात मी काहीही बोललो नाही. ही विचारांची लढाई असून आक्रमण जरी होत असले तरी अधिक मजा येत आहे. गेली 5 वर्षे मी लढतो आहे, या पुढील १० वर्ष आणखी दहा पटीने लढेन, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
या संदर्भात याचिकाकर्ते वकील धृतिमान जोशी म्हणाले, न्यायालयात राहुल गांधी यांनी माफी मागितलेली नाही. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात आमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते आम्ही न्यायालयात सादर करणार आहोत. या संदर्भात पुढील सुनावणी 21 सप्टेंबर रोजी होणार आहे.