मुंबई - १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर लाँग विकेण्डचा फायदा घेण्यासाठी बॉलिवूडमध्ये दोन मोठे सिनेमे प्रदर्शित झाले. अक्षय कुमार आणि विद्या बालनचा ‘मिशन मंगल’ तर जॉन अब्राहमचा ‘बाटला हाऊस’ या दोन्ही सिनेमांची बॉक्स ऑफिसवर तगडी टक्कर झाली. पहिल्या दोन दिवसात ‘मिशन मंगल’ने ४६ कोटी ४४ लाख तर ‘बाटला हाऊस’ने २४ कोटी ३९ लाख रुपयांचा बिझनेस केला. कोट्यवधींचे हे आकडे ऐकून तुम्हाला नक्कीच आनंद झाला असेल. मात्र, या दोन्ही सिनेमांनी मराठी सिनेमाच्या निर्मात्याचे पुरते कंबरडे मोडले आहे.
९ ऑगस्ट रोजी अमेय खोपकर निर्मित ‘येरे येरे पैसा-२’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. पहिला भाग चांगला चालल्यामुळे साहजिकच प्रेक्षकांनी दुसरा भाग पाहण्यासाठी सिनेमागृहांमध्ये गर्दी केली. पहिल्या विकेण्डला तर मुंबई, पुण्यातील अनेक सिनेमागृहांमध्ये या सिनेमाला हाऊसफुल्ल रिस्पॉन्स मिळाला. मात्र, पश्चिम महाराष्ट्रात मात्र पूरजन्य परिस्थितीमुळे हा सिनेमा रिलीज होऊ शकला नाही. तरी सिनेमाचा प्रतिसाद वाढत असतानाच हे दोन सिनेमे प्रदर्शित झाल्यामुळे बहुतांश सिनेमागृहांमधून या सिनेमाचे शोज रद्द करण्यात आले. तर काही मल्टीप्लेक्समधून त्याचा प्राईम टाईम शो काढण्यात आले.
या अन्यायाला सगळ्यात आधी सिनेमाचे निर्माते आणि मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी वाचा फोडली. त्यांनी फेसबूक लाईव्ह करून ही परिस्थिती प्रेक्षकांना सांगितली. आजवर जवळपास २०० मराठी सिनेमांना हक्काचे थिएटर मिळवून देण्यासाठी लढा दिलेल्या अमेय यांना स्वतःचा सिनेमा थिएटरमध्ये टिकवण्यासाठी सारे खटाटोप करावे लागले. पक्षाचे पाठबळ असूनही यावेळी 'खळ्ळ खटॅक'ची भाषा न वापरता त्यांनी प्रेक्षकांनाच हा सिनेमा पाहण्याचे आवाहन केले. त्यांच्यापाठोपाठ सिनेमाचा दिग्दर्शक हेमंत ढोमे यानेही सोशल मीडियाद्वारे हीच भूमिका मांडली. तर अमेय यांचे मित्र दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी स्वतःही असाच व्हिडिओ पोस्ट करून त्यांना पाठिंबा दिला. मात्र,तरीदेखील प्रेक्षकांनी सिनेमाकडे पाठ फिरवली. उपनगरातील थिएटर्समध्ये आजही येरे येरे पैसा-२ ला प्राईम टाईम शोज असले तरीही मुंबईतील अनेक थिएटर्समधून या सिनेमाची गच्छंती करण्यात आली.
एकीकडे या सिनेमाचे संपूर्ण शुटिंग लंडनमध्ये करून दर्जात कोणतीही कसर न ठेवता एक चांगला करमणूक प्रधान सिनेमा देण्याचा प्रयत्न या टीमने केला होता. मात्र, प्रेक्षकांनीच सिनेमाकडे पाठ फिरवल्यामुळे आता पुन्हा कोणता निर्माता असे धाडस करेल, असे वाटत नाही. त्यामुळे बॉलिवूड एकीकडे येरे येरे पैसा म्हणत बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींचे कलेक्शन गोळा करत आहे तर तेच दुसरीकडे मराठी सिनेमाची झोळी मात्र पुन्हा एकदा रिकामीच राहिली आहे.