मुंबई: मुलुंड पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी सराईत आरोपीला अटक केली आहे. या आरोपीकडून १५ मोटार स्कुटर हस्तगत करण्यात आल्या आहेत. गौरंग आनंद चौधरी उर्फ सॅण्डी, वय २३ वर्षे असे आरोपीचे नाव आहे. तो दिवा येथे राहणारा आहे. कलम ३७९ अन्वये दाखल गुन्ह्यातील तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे असलेली सुझुकी अॅक्सेस १२५ एमएच 03 डीआर 6490 ही 24 जानेवारीला रात्री 7.25 वाजताच्या सुमारास मुलुंड पश्चिम येथील तांबे नगर परिसरातील शांती आटा शॉप क्रमांक ०२ याठिकाणी रोडलगत पार्क केली होती. तक्रादार त्यांचे काम आटोपून दुचाकी पार्क केलेल्या ठिकाणी आले, असता त्यांची मोटरस्कुटर पार्क केलेल्या केलेल्या ठिकाणी नव्हती. त्यामुळे त्यांनी आजूबाजूच्या परिसरात स्कुटर शोध घेतला. परंतु स्कूटर मिळाली नाही.
तक्रारीवरून गुन्हा दाखल: तक्रारदार यांची चोरीला गेलेल्या दुचाकीच्या शोधादरम्यान, तक्रारदार यांच्या मोबाईलवर त्यांची चोरी झालेल्या ॲक्सेस दुचाकी गाडीवर वाहतूक विभागाने दहा हजार पाचशे रुपयांचा दंड बजावल्याचा एसएमएस धडकला. तक्रारदाराच्या पायाखालची जमीन सरकली होती. तक्रारदार यांची मेसेज आल्यानंतर खात्री झाली की, कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांची गाडी चालवली आहे. त्यानंतर त्यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात जाऊन दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीसांचा कौशल्यपूर्वक तपास: या गुन्हयाचा तांत्रिक तपास तसेच संशयिताची गोपनिय माहिती या आधारे संशयित आरोपी हा दिवा पश्चिम, ठाणे येथे असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे दिवा पूर्व येथे तपास पथकाने सापळा लावून संशयितास शिताफिने ताब्यात घेतले आहे. पोलीसांनी कौशल्यपूर्वक तपास केला. त्याने चोरी केलेल्या एकूण १५ मोटर स्कूटर जप्त करण्यात आल्या आहेत.
तपास पथकास यश: जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत 7 लाख 50 हजार इतकी आहे. अशाप्रकारे मुलुंड पोलीस ठाण्याच्या तपास पथकास यश आले आहे. हस्तगत करण्यात आलेल्या मोटार स्कुटरचा आढावा घेतला. त्यामध्ये मुलुंड येथील चार, घाटकोपर येथील दोन, पवई येथील दोन, एमआयडीसी येथील दोन, मुंद्रा येथील एक, नौपाडा येथील एक, कापुरबावडी परिसरातील एक आणि पडघा येथील एक दुचाकी चोरीस गेलेले असे पोलीस ठाण्यांचे दाखल गुन्हे उघडकीस आलेले आहेत.