मुंबई MS Dhoni Winning Six : भारतात पुढच्या महिन्यापासून विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची रणधुमाळी रंगणार आहे. भारतात विश्वचषक होत असताना १२ वर्षांपूर्वी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं लगावलेला विजयी आयकॉनिक षटकार चाहत्यांना आजही स्मरणात आहे. आता भारतात पुन्हा एकदा विश्व चषक क्रिकेट स्पर्धेची रणधुमाळी होणार असल्याने याच आठवणींना उजाळा देण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशननं वेगळा उपक्रम हाती घेतलाय. १२ वर्षापूर्वी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं लगावलेला तो विजयी षटकार ज्या खुर्च्यांवर जाऊन आदळला त्या खुर्च्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच अधिकृत पत्रकार परिषद घेतली जाणार असून त्यात संपूर्ण सविस्तर माहिती दिली जाणार असल्याचं मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अजिंक्य नाईक यांनी सांगितलंय.
भारताला विजयासाठी होतं २७५ धावांचं लक्ष्य : कपिल देव यांच्या नेतृत्वात भारतानं १९८३ साली पहिला क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर २८ वर्षांनंतर भारतातच झालेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि श्रीलंका यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताला विजयासाठी ११ चेंडूत ४ धावांची गरज असताना, कर्णधार धोनीनं षटकार लगावत भारताला विजय मिळवून दिला होता. तो ऐतिहासिक षटकार आता कायमच यादगार राहणार आहे. त्या सामन्यात श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा ५० षटकांमध्ये २७४ धावा करत श्रीलंकेनं भारताला विजयासाठी २७५ धावांचं लक्ष्य दिलं होतं. त्या सामन्यात भारताचा फलंदाजी क्रम अतिशय मजबूत होता. परंतु, सुरुवातीला वीरेंद्र सेहवाग शून्यावर बाद झाल्यानंतर सचिन तेंडुलकरही १८ धावांवर बाद झाला होता. त्यानंतर गौतम गंभीरनं ९७ आणि विराट कोहलीनं ३५ धावा करत सामना जिवंत ठेवला होता. याच सामन्यात धोनीनं आक्रमक पवित्रा घेत नाबाद ९१ धावा केल्या व भारताला विजय मिळवून दिला होता.
२०११ वर्ल्ड कप मेमोरियल सीट्स : विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे ४९ वे षटक श्रीलंकेचा गोलंदाज नुवान कुलसेकरा टाकत होता. या दरम्यान भारताला विजयासाठी ११ चेंडूत ४ धावांची आवश्यकता असताना धोनीने लाँग ऑनच्या दिशेने षटकार लगावत २८ वर्षाने भारताला विश्वचषक जिंकून दिला होता. यावर्षी एप्रिल महिन्यात मुंबई-चेन्नई यांच्यातील आयपीएल लढती दरम्यान धोनी वानखडेवर उपस्थित होता. त्यावेळी एमसीएचे अध्यक्ष अमोल काळेंनी धोनीनं लगावलेल्या विजयी षटकाराच्या त्या खुर्च्यांजवळ एक स्मृतीचिन्ह उभारण्यात येईल असं म्हटलं होतं. मात्र, आता तसं न करता या खुर्च्यांचा थेट लिलाव करण्याचा निर्णय एमसीएने घेतला आहे. या खुर्च्यांना २०११ वर्ल्ड कप मेमोरियल सीट्स असं ओळखलं जाणार आहे.
क्रिकेट प्रेमींना पैसे मोजावे लागणार : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा तो शेवटचा वर्ल्डकप होता. त्यामुळं सचिनला घरच्या मैदानावर वर्ल्ड कपची भेट देण्यास भारतीय संघ उत्सुक होता व धोनीच्या षटकाराने हा विश्वचषक भारताकडे आला होता. आजही वानखडे मैदानावर मिळवलेला विश्वविजय भारतीय क्रिकेट इतिहासातील सुवर्णक्षण म्हणून ओळखला जातो. त्यासोबत कर्णधार धोनीचा खणखणीत षटकार हा कधीही क्रिकेट प्रेमींच्या हृदयातून हद्दपार होणार नाही. धोनीनं लगावलेला षटकार ज्या बाकड्यांवर आदळला होता, त्या बाकड्यांवर कोणतेही स्मारक होणार नसून या सीट्स धोनीच्या नावाने डिझाईन केल्या जाणार आहेत. त्यानंतर त्या कायमच्या एम. एस. धोनी सीट्स म्हणून ओळखल्या जाणार आहेत. या बाकड्यांना सुशोभित करण्यात येणार असून या जागा पूर्णतः सोफ्यासारख्या असतील. या सीट्ससाठी क्रिकेट प्रेमींना वेगळे पैसे मोजावे लागणार आहेत. वानखडे स्टेडियमवर असलेल्या सचिन तेंडुलकर स्टँड मधील लेव्हल दोन येथे या एम. एस. धोनी सीट्सचा लिलाव करण्यात येणार आहे.
पुढील दहा दिवसांत होणार लिलाव : यंदा भारतात होणाऱ्या विश्वचषकाला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक असल्याने विश्वचषकापूर्वी त्या सीट्सचा लिलाव करणार असल्याची माहिती एमसीएच्या वेबसाईटवर देण्यात आलीय. जे लोक लिलाव जिंकतील त्यांना विशेष आदरातिथ्य दिले जाणार असून, या दोन बाकड्यांसाठी क्रिकेट प्रेमींना मोठी किंमत मोजावी लागणार आहे. पुढील दहा दिवसांत हा लिलाव होणार असून, याविषयीची अधिक माहिती एमसीएच्या वेबसाईटवर देण्यात आलीय.
हेही वाचा :