मुंबई - कोरोनाचे संकट उभे टाकले आहे. या पार्श्वभूमीवर मुस्लीम समाजाने आपला शब-ए-बरात हा सण साजरा करण्यासाठी स्मशानात जाण्याचा आग्रह न करता तो आपल्या घरातच साजरा करावा. घरातूनच आपल्या भावना व्यक्त कराव्यात, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपल्या फेसबूक लाईव्हवरुन केले. हा सण गुरुवारी आहे.
ईस्लाम धर्माचा हा शाबान महिना सुरु असून याच महिन्यात येणारा शब-ए-बरात हा पितृपुजेचा दिवस गुरुवारी (दि. ९ एप्रिल) रोजी येत आहे. या दिवशी मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणात कब्रस्तानामध्ये जाऊन आपल्या पुर्वजांची आठवण करतात. त्यानंतर सर्वात जास्त दान देण्याचा कार्यक्रम करतात. या दिवशी करण्यात येणारे दान हे आपल्या पुर्वजांना पुण्य मिळवून देण्यासाठी उपयोगी पडते, अशी भावना यामागे आहे. यामुळेच या दिवशी कब्रस्तान आणि परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यासोबत बाहेरच दान देण्याचा कार्यक्रम होत असल्याने या ठिकाणी गर्दीही होते.
राज्यात कोरोनाचे संकट अधिक गडद होत असून या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुस्लीम बांधवानी आपला हा शब-ए-बरातचा सण कब्रस्तानमध्ये न जाता घरातच साजरा करून आपल्या पुर्वजांबद्दलच्या भावना व्यक्त कराव्यात, असे आवाहन केले आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनीही असे आवाहन केले होते.