मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा मुंबईत येत आहेत. महिनाभरात हा पंतप्रधानांचा दुसरा मुंबई दौरा आहे. एकाच महिन्यात पंतप्रधानांचा हा दुसरा मुंबई दौरा असल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आजच्या दौऱ्यात पंतप्रधान वंदे भारत एक्सप्रेसच्या दोन गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. याशिवाय सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड आणि कुरार अंडरपास हे दोन रस्त्यांचे लोकार्पण देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
भाजप आणि मिंधे गटाचे नेते असमर्थ : पंतप्रधानांच्या आजच्या दौऱ्याबाबत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, जोपर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाहीत, किंवा ते स्वतः तारीख ठरवत नाहीत. तोपर्यंत कदाचित त्यांचा मुक्काम मुंबईतच राहू शकतो. कारण, बृहमुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी महाराष्ट्राचे भाजपचे आणि मिंधे गटाचे नेते असमर्थ आहेत, हेच यावरून दिसून येते. इथे मोदी किती वेळा आले किंवा अख्खा देश जरी त्यांनी इथे लावला, जसे इतर राज्यांमध्ये लावतात. तरी मुंबई महानगरपालिकेत शिवसेना जिंकेल.
मुंबईत शिवसेनाच येणार : पुढे बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, तुम्ही या निवडणुकीत कितीही मोदी कार्ड जरी वापरले, तरी मुंबईत शिवसेनाच येणार. एका बाजूला पार्लमेंटमध्ये अनेक महत्वाच्या घडामोडी सुरु असताना मोदी मुंबईत येतात. कारण, मोदींना महापालिका जिंकायची आहे. देशाचे पंतप्रधान एका महानगरपालिकेच्या निवडणुकीत इतका रस दाखवतात, यातच सर्व काही आले. त्यामुळे हे भाजप आणि मिंधे गटाचे स्पष्ट अपयश आहे. सभागृहात राहुल गांधी यांनी अत्यंत सोपे प्रश्न विचारलेत, का मोदींनी उत्तर दिले नाही? अदानीच्या मागे कोणती शक्ती आहे? हे मोदींनी सांगावे. या सर्व अदानी प्रकरणात एक खासदार म्हणून माझीही मागणी आहे, की, जॉईंट पार्लमेंट कमिटीकडून अदानी प्रकरणाची चौकशी व्हावी. ही चौकशी निपक्षपाती असावी. मोदींनी यावे, मुंबईत घर घ्यावे, राजभवनवर राहावे, पालिका काही मिळणार नाही. असा निशाणा संजय राऊत यांनी साधला आहे.
भाजपचे आमदार शिंदे गटात : तर दुसरीकडे सध्या शिंदे भाजप सरकारमधील समर्थक पक्षाचे नेते व आमदार बच्चू कडू यांनी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीचे दहा ते पंधरा आमदार भाजप किंवा शिंदे गटात जातील, असे भाकीत केले आहे. यावर देखील खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. खासदार राऊत म्हणाले की, स्वतः बच्चू कडू ही प्रवेश करताय का? हे आधी स्पष्ट करा. माझी माहिती आहे की, भाजपचे 20-25 आमदार मिंधे गटात प्रवेश करत आहेत. विशेष म्हणजे यात स्वतः बच्चू कडू देखील आहेत. असा खोचक टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.