मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह विधान केले. या घटनेनंतर राज्यात मोठा वादंग निर्माण झाला. मात्र हा वाद काही थांबताना दिसत नाही. शिवसेनेला डिवचण्यासाठी थेट केंद्रातून राणे यांना बळ दिले जात आहे. मुंबई आणि दिल्लीत घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकताच फोनवरुन नारायण राणे यांच्याशी संपर्क साधला. त्यामुळे आता भाजप नारायण राणे यांच्यावरील कारवाईचा वचपा काढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांना देखील मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दौरा अर्धवट सोडून राऊत मुंबईत
संजय राऊत भुवनेश्वरच्या दौऱ्यावर होते. मात्र दोन दिवसात घडलेल्या घडामोडींमुळे राऊत यांना तातडीने मुंबईत बोलवण्यात आले आहे. राऊत भुवनेश्वर दौरा अर्धवट सोडून मुंबईत परतले आहेत. त्यामुळे आता नक्की काय घडणार? याकडे लक्ष लागले आहे.
अमित शहा काय बोलले?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नारायण राणे यांची विचारपूस केली. तसेच पोलीस कारवाई आणि अटकेच्या कारवाई तपशीलही अमित शाह यांनी नारायण राणे यांना विचारला असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी दिवसभरात भाजपच्या नेत्यांकडून नारायण राणे यांना समर्थन देणारी वक्तव्ये करण्यात आली. या सगळ्यातूनच भाजपने आपण नारायण राणे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचा संदेश दिल्याची चर्चा आहे.
हेही वाचा - नारायण राणेंचा शिरच्छेद करणाऱ्याला 51 लाखांचे बक्षिस - विश्व हिंदू सेना अध्यक्ष अरूण पाठक