मुंबई - 'एका नटीच्या बेकायदा बांधकामासाठी तिच्या बाजूने उभे राहणारे हाथरसला जाऊन पीडित मुलीच्या न्यायाची लढाई लढणार का? असा प्रश्न टोला शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. राऊत यांनी हाथरस येथील सामूहिक अत्याचार व हत्या प्रकरणाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणीही त्यांनी योगी सरकारवर टीका केली.
नटीच्या बेकायदा बांधकामासाठी आकांडतांडव करणारे लोक आता कुठे गेले? ते आता हाथरसला जाणार आहेत का? दलित समाजातील पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायाची लढाई लढणार आहेत का? असे प्रश्न राऊत यांनी उपस्थित केले. पीडित मुलीच्या कुटुंबीयांचा आक्रोश जगापर्यंत पोहोचू नये म्हणून योगी सरकार दडपशाही करत आहे, असा आरोप राऊत यांनी केला. ती मुलगी सेलब्रिटी नव्हती, म्हणून तिला न्याय नाकारणे हे 'रामराज्या'च्या गप्पा मारणाऱ्यांना शोभत नाही, असा टोलाही त्यांनी भाजपाला हाणला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली, असे प्रकार महाराष्ट्रात कधी घडले नाहीत आणि घडणारही नाहीत, अशी ग्वाही राऊत यांनी दिली. दरम्यान, राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी अनेकांनी निषेध नोंदवला असून योगी सरकारवर टीकेची झोड उठत आहे.