मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लसीकरणाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. लोकांच्या जीवाचे रक्षण करणाऱ्या लसींचा आणि इंजेक्शनचा गैरवापर होता कामा नये. संपूर्ण देश तुमचा आहे. मोदींनी फक्त गुजरातवर प्रेम करू नये, अशी टीका राऊत यांनी केली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही -
कोरोनामुळे देशाची परिस्थिती गंभीर असून ती हाताबाहेर गेली आहे. कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. प्रत्येक वेळी केंद्र सरकारने आपल्या पक्षाचा स्वार्थ पाहून निर्णय घेणे हे चुकीचे असल्याची टीका त्यांनी केली.
बंगालमधील चित्र भयावह -
धर्म, जात, निवडणुका यापेक्षा लोकांचे जीव महत्वाचे आहेत. पश्चिम बंगालमध्ये जे शक्तीप्रदर्शन सुरू आहे याचे चित्र खूप भयावह आहे. लोकांच्या जीवाचे रक्षण करणाऱ्या लसींचा आणि इंजेक्शनचा गैरवापर होता कामा नये. याची चर्चा राष्ट्रीय स्तरावर व्हायला हवी. जे तज्ज्ञ आहेत, त्यांनी बोलायला हवे. यामागे राजकारण आहे की व्यापार आहे हे शोधायला हवे, असेही त्यांनी म्हटले.