मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मागणीविषयी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने एवढे पोपट पाळून ठेवले आहेत, त्यांना पोपटपंची करू द्या. नोटबंदीवेळी हजारांवर लोकं रांगेत मेली, हा मनुष्यवध आहे. त्यांना त्याच्यावर देखील बोलायला सांगा. उत्तर प्रदेशात गंगेमध्ये प्रेत वाहत आली. गुजरातचे मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली पाहिजे. ढिसाळ आयोजनावर बोला. पुरस्कार सोहळ्यानंतर जी मेजवानी झाली, त्या मेजवानीवर बोला. उठसूठ उद्धव ठाकरेवर बोलत आहेत.
मेजवानीची देखील चौकशी करा : खारघरमध्ये जो मृत्यू तांडव झाला, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक सदस्य समिती सरकारने स्थापन केली आहे. यावर बोलताना खासदार राऊत म्हणाले की, समितीचे सदस्य हे प्रामाणिक अधिकारी आहेत. त्यांच्यावर मी टीका करणार नाही. परंतु नाना पटोले यांनी जी भूमिका मांडली, त्याच्याशी मी सहमत आहे. मृतांचा आकडा हा जास्त आहे. लोकांना पाणी मिळत नव्हते. शाही मेनू काय होता? हे देखील बाहेर आले आहे. त्यांना गर्दीचे चित्र ड्रोनच्या माध्यमातून करायचे होते. देशाला दाखवायचे होते की गर्दी किती आहे? हा सदोष मनुष्यवध आहे. एक सदस्य समिती या शाही मेनूची आणि शाही मेजवान यांची चौकशी करणार आहे का? असा सवाल खासदार राऊत यांनी उपस्थित केला आहे.
हाच निकाल का लागत नाही : मराठा आरक्षणाच्या सध्याच्या स्थितीवर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, त्यावेळचे विरोधी पक्ष नेते आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळी म्हणाले होते, आमच्या हातात फक्त तुम्ही सत्ता द्या, दोन दिवसात मराठा आरक्षण देतो. तेव्हापासून आम्ही या आरक्षणाची वाट बघत आहोत. आज सर्व निकाल यांच्या मनाप्रमाणे लागत आहेत. पण महाराष्ट्राचा इतका महत्त्वाचा विषय असताना मनाप्रमाणे निकाल मिळू शकला नाही. धनगर समाज असेल, मराठा समाज असेल त्यांचे आता काय झाले. तुमच्या हातात दोन महिन्यांपासून सत्ता आहे. धनुष्यबाण काढून घेण्यासाठी तुमच्या बरोबर हालचाली असतात. मराठा आरक्षणासाठी तुम्ही कुठे कमी पडला? हे लोकांसमोर येऊन तुम्ही सांगायला हवे.
ती कंपनी कोणाची? पुढे बोलताना राऊत म्हणाले की, आमच्या अभंगात तुम्ही सामील व्हा. आमचा अभंग आणि तुमचे कीर्तन थोतांड आहे. अभंग ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे. ताकद असेल तर अभंगाला उत्तर द्या, नुसते टाळ तरी कुठून दाखवा. तुम्ही फक्त चिपळ्या वाजवत आहात. आमच्या अभंगामुळे महाराष्ट्रात वातावरणात परिवर्तन होताना दिसून येते. खारघरमध्ये नेमके काय घडले? हे चिपळ्या वाजवून सांगा. ज्या कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट दिले, ते कॉन्ट्रॅक्ट कोणी दिले? ती कंपनी कोणाची आहे? हे सांगा. या मिंधे गटाने कुठे कुठे काम केले आहे, याची माहिती द्यावी.अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.