मुंबई - नवनिर्वाचीत खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची कृष्णकुंज येथे भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानायला आलो असल्याचे यावेळी कोल्हेंनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी दिलेल्या भाषणाचा मला नक्कीच फायदा झाला आहे. यापुढे ते आणखी भाषण देतील की नाही हा प्रश्न त्यांचा असल्याचे कोल्हे म्हणाले. अमोल कोल्हेंनी राज ठाकरेंची भेट घेतल्यावर अनेक राजकीय चर्चेला उधाण आले. यावर अमोल कोल्हेंना विचारले असता, विधानसभेबाबत कोणतीच राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच राज ठाकरेंसोबत खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाल्याचेही अमोल कोल्हे म्हणाले.