मुंबई : कौटुंबिक क्षुल्लक वादातून सूनेने ७२ वर्षांच्या वयोवृद्ध सासूला बेदम मारहाण केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी खार परिसरात घडली. या मारहाणीत वेणूबाई वाते ही महिला गंभीररीत्या जखमी झाल्या होत्या. त्यांना हालचालही करता येत नव्हती. अशा वेळेस खार पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस शिपाई निकिता म्हात्रे हिने या वयोवृद्धेला हाताच्या कडेवर उचलून इमारतीच्या चवथ्या मजल्यावरुन खाली आणले. शंभर मीटर अंतरावरुन तिला घेऊन पोलीस व्हॅनमधून वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. महिला दिनी एका महिलेने दुसर्या महिलेला केलेल्या मदतीसह तिच्या या कामगिरीचे पोलीस दलात सर्वत्र कौतुक होत आहे.
सूनेची बेदम मारहाण : वेणूबाई वाते ही ७२ वर्षांची वयोवृद्ध महिला खार येथील खारदांडा, सप्तश्रृंगी निवास इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहते. ८ मार्चला महिला दिनीच क्षुल्लक कौटुंबिक वादातून वेणूबाई यांना तिच्याच सूनेने बेदम मारहाण केली होती. मारहाणीत ती जखमी झाली होती. जखमी झाल्याने तिचा काहीच हालचाल करता येत नव्हती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक माणिक घोगरे, पोलीस शिपाई विशाल घार्गे आणि निकिता म्हात्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी पोलिसांना घडलेला प्रकार समजला. मारहाणीमुळे वेणूबाईला काहीच हालचाल करता येत नव्हती. तिला वैद्यकीय उपचाराची तातडीने गरज होती. त्यामुळे रुग्णवाहिकेची वाट न पाहता शिपाई निकीता म्हात्रे हिने वेणूबाईला हाताच्या कडेवर उचलून चौथ्या मजल्यावरुन खाली आणले.
निकिता म्हात्रे यांचे कौतुक : शंभर मीटर पायी चालत पोलिसांच्या व्हॅनमधून भाभा रुग्णालयात दाखल केले. तिथेच वेणूबाई हिच्यावर उपचार सुरु आहे. तिची अद्याप जबानी नोंदविण्यात आली नाही. तिच्या जबानीनंतर तिच्या सूनेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहे. दुसरीकडे निकिता म्हात्रे यांनी वेणूबाई यांना हालचाल करता येत नसल्याने त्यांना वेळीच रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या या कामगिरीचे वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसह खार पोलीस ठाण्यातील तिच्या सहकारी अधिकारी आणि कर्मचार्यांनी निकिता म्हात्रे यांचे कौतुक केले आहे.
निकिता म्हात्रे यांना पारितोषिक : जखमी वृद्ध महिलेस हालचाल करता येत नसल्याने खार पोलीस ठाणेच्या महिला पोलीस शिपाई म्हात्रे यांनी त्यांना हाताच्या कडेवर उचलून चौथ्या मजल्यावरून खाली आणून १०० मीटर चालत मुख्य रस्त्यावर आणले आणि रुग्णालयात दाखल केले. या कर्तृत्वामुळे महिला शिपाई म्हात्रे यांचे कौतुक केले जात आहे. कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी प्रशस्तीपत्र आणि पारितोषिक देऊन म्हात्रे यांचे कौतुक केले.