मुंबई - शहरात लॉकडाऊनच्या काळात २० मार्च ते ३ मे दरम्यान संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ५ हजार ८०१ प्रकरात तब्बल १० हजार ९६१ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यापैकी १ हजार ३५३ आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. २ हजार ८५९ आरोपींना नोटीस देऊन, तर ६ हजार ७४९ आरोपींना जामिनावर सोडण्यात आले आहे.
मुंबईत कोरोना विषाणूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाय योजना प्रशासकीय स्तरावर केल्या जात आहेत. राज्यात लॉकडाऊनचा काळ 17 मेपर्यंत वाढवला गेला असून पोलिसांकडून कलम 144 शहरात लागू करण्यात आले आहे.
गेल्या २४ तासांत ४४ जणांवर कारवाई -
गेल्या 24 तासात मुंबई शहरात कलम 144 नुसार पोलिसांनी तब्बल 44 जणांवर कारवाई केली आहे. यामध्ये विनापरवाना हॉटेल, आस्थापना सुरू ठेवणारे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणारे व अवैध वाहतूक करणाऱ्यांचा समावेश आहे. दक्षिण मुंबईत एकूण 4 जणांवर कारवाई करण्यात आली असून, मध्य मुंबई 25, पूर्व मुंबईत 3, पश्चिम मुंबई 9 आणि उत्तर मुंबई 3, अशी कारवाई मुंबई पोलिसांनी केली आहे.