मुंबई: किल्ल्याचा समुद्र बाजूचा भाग भित अत्यंत खराब अवस्थेत असून दृश्य पाहणी केल्यास किल्ला अत्यंत जीर्ण झालेला दिसतो. यापुढे तेथे राहणे रहिवाशांसाठी अत्यंत जोखमीचे होते. कारण किल्ल्याचा काही भाग किंवा पूर्णपणे कोसळल्यास मोठ्या संख्येने जीवितहानी होऊ शकते. कारण या किल्ल्यावर २६७ झोपड्या आणि अंदाजे ३००० रहिवासी राहत होते. त्यामुळे मोठ्या जनतेच्या हिताच्या उद्देशाने मानवतेच्या आधारावर आणि कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी माहीम किल्ला रिकामा करणे आणि पात्र झोपडीधारकांना विशेष प्रकल्प मानून त्यांना पर्यायी निवास व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक होते. तसेच, महाराष्ट्र व मुंबईतील ऐतिहासिक वारसा असलेली वस्तू जपणे अत्यंत गरजेचे होते.
माहीम किल्ल्यावर अतिक्रमण: १९७२ मध्ये, प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष अधिनियम, १९६० अन्वये जेव्हा माहीमचा किल्ला महाराष्ट्र अंतर्गत राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आला तेव्हा, सीमाशुल्क विभागाने गडावरील विद्यमान सुरक्षा काढून टाकली. ज्यामुळे किल्ल्यावर संपूर्णपणे अतिक्रमण झाले. या किल्ल्याचा पुनर्विकास करण्याकरिता सदर प्रकल्प विशेष प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला. माहीम किल्ल्यावर असलेल्या झोपड्यांचे टोटल स्टेशन सर्व्हेयर मार्फत सर्व्हे करण्यात आहे. झोपडीधारकांना नोटीस देवून झोपड्यांचे पुरावे, कागदपत्रे मागविण्यात आले व त्यांनी सादर केलेल्या पुरावे, कागदपत्रांच्या आधारे महापालिकेच्या धोरणांनुसार सदर झोपडीधारकांची पात्रता निश्चित करून त्यांना परिशिष्ट ०२ तयार करण्यात आले.
माहीम किल्ल्याचा इतिहास: माहीम किल्ला मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यालगत, माहीम समुद्रकिनाऱ्याच्या अगदी जवळ वसलेला आहे. अपरंता ( उत्तर कोकण) येथील राजा बिंबदेव याने येथे आपले राज्य बसावले. या राज्याला महिकावती असे देखील म्हणतात. बिंबदेव राजाणे बसावलेले राज्य भरभराटीला आले आणि त्याच्या वंशजांनी माहीम मध्ये माहीम किल्ला ११४० आणि १२४१ दरम्यान बांधला. इंग्रजांनी माहीमचा किल्ला एके काळी बंदर म्हणून वापरला असून तेथे सीमाशुल्क गृह उभारले होते.
झोपड्यांना पर्यायी जागा : माहीम किल्ल्यावरील एकूण २६७ पैकी २६३ झोपडीधारक पात्र ठरविण्यात आले. पुनर्वसन योग्य ठिकाणी करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला. मालाड येथील साईराज गुराईपाडा येथे १७५, भंडारी मेटलर्जी येथील ७७ आणि मालवणी येथील रॉयल फिंच इमारतीमधील ११ सदनिका पी / उत्तर विभाग यांच्याकडून प्राप्त करून झोपडपट्टी धारकांना वितरित करण्यात आल्या. त्यातील काही लोकांनी सदनिकांचा ताबा घेतला तर काहींनी ताबा घेतला नव्हता. त्यामुळे पोलिस बळाचा वापर करून झोपड्या रिकाम्या करून परिसर अतिक्रमण मुक्त करण्यात आला आहे अशी माहिती प्रशांत सपकाळे यांनी दिली.