मुंबई - मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. पालिकेच्या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार केले जात असल्याने इतर आजारांच्या रुग्णांवर उपचार केले जात नसल्याचा आरोप केला जात आहे. त्याबाबत माहिती देताना पालिका प्रशासनाने मुख्य रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, प्रसुतिगृहे, दवाखाने यांच्यासह खासगी नर्सिंग होममध्ये कोविड आजाराव्यतिरिक्त इतर आजारांसाठी उपचार घेता यावेत, म्हणून सुमारे ७ हजार ५०० पेक्षा अधिक खाटांसह आवश्यक त्या सर्व उपचार सुविधा उपलब्ध असल्याचे कळविले आहे.
महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांपैकी शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालयामध्ये १ हजार २७८, परळच्या केईएम रुग्णालयामध्ये १ हजार ७११ आणि जुहू-विलेपार्लेच्या डॉ. कूपर रुग्णालयामध्ये ५५० अशा एकूण ३ हजार ५३९ खाटा नॉन कोविड म्हणजे कोरोना वगळता इतर आजारांवर वैद्यकीय उपचार आवश्यक असलेल्या रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. महानगरपालिकेच्या १७ उपनगरीय रुग्णालयांमध्ये ३ हजार ७६ खाटा नॉन कोविड आहेत. २७ मॅटर्निटी होम म्हणजे प्रसुतिगृह मिळून ८९९ खाटा आहेत. या सर्व खाटांची संख्या ही ७ हजार ५१४ इतकी आहे.
मुंबईभर असलेल्या एकूण १८७ महापालिकेचे दवाखाने आणि १ हजार ४१६ खासगी नर्सिंग होमदेखील कोविड वगळता इतर उपचारांसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी इतर आजारांवरील उपचार, सेवा -सुविधांबाबत चिंता करू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
खाटांची माहिती इथे मिळवा -
कोरोना वगळता इतर विविध आजारांबाबत उपचारांची सुविधा असलेली महानगरपालिकेची प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, प्रसुतिगृह, दवाखाने तसेच खासगी नर्सिंग होम इत्यादींचे विभागनिहाय नांव, पत्ता, संपर्क क्रमांक यांची यादी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जनतेच्या माहितीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच याबाबत अधिक माहितीसाठी महानगरपालिकेचा हेल्पलाईन क्रमांक १९१६ वर देखील संपर्क साधता येईल. कोविड आजाराव्यतिरिक्त आवश्यक उपचारांसाठी नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.