मुंबई - मुंबईत मार्च पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात आटोक्यात आला असताना ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली होती. मात्र गेल्या काही दिवसात पुन्हा रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. आज मुंबईत कोरोनाच्या नव्या 1222 रुग्णांची नोंद झाली असून 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या पंधरा दिवसात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 69 वरून 126 दिवस इतका वाढला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईत आज (रविवारी) कोरोनाचे 1222 नवे रुग्ण आढळून आले असून 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 33 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 31 पुरुष तर 15 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 51 हजार 283 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 062 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 1013 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 20 हजार 165 वर गेला आहे. सध्या मुंबईत 19 हजार 721 सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 126 दिवस
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 126 दिवस तर सरासरी दर 0.55 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 632 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 8 हजार 503 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 14 लाख 49 हजार 262 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.