मुंबई - मुंबईत कोरोनाचे नवे 1 हजार 571 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे मुंबईमधील कोरोना रुग्णांचा आकडा 19 हजार 967 वर पोहचला आहे. तर 38 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 734 वर पोहचला आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. मुंबईत रोज 700 ते 900 रुग्ण आढळून येत असताना 1 हजार 571 रुग्ण आढळून, आल्याने आजच्या दिवसात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.
मुंबईत कोरोनाचे नवे 1 हजार 571 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 981 रुग्ण गेल्या 24 तासात आढळून आले आहेत. तर 10 ते 14 मे दरम्यान खासगी लॅबमध्ये करण्यात आलेल्या चाचणीत 590 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईत 38 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी गेल्या 24 तासात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 8 ते 15 मे दरम्यान 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या 13 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचा अहवाल येणे बाकी होता.
हा अहवाल आल्यावर या 13 जणांच्या मृत्यूची नोंद कोरोनाच्या मृत्यूंमध्ये करण्यात आली आहे. 38 मृतांपैकी 23 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. 38 मृतांपैकी 28 पुरुष तर 10 महिला रुग्ण होते. मुंबईमधून गेल्या 24 तासात 206 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, आतापर्यंत मुंबईमधून 5 हजार 12 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.