मुंबई - राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामधील सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यूंची नोंद मुंबईत झालेली आहे. रविवारपर्यंत मुंबईतील सहा वॉर्ड कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. त्यात अंधेरी पूर्व आणि पश्चिम, धारावी, दादर, मालाड, भांडुप, कुर्ला या सहा विभागांचा समावेश आहे. येथील रुग्णसंख्या 4 हजारांवर गेली आहे. तर मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 41 दिवसांवर गेला आहे.
मुंबईत 11 मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून जी-साऊथ वॉर्ड म्हणजेच वरळी, प्रभादेवी, धारावी, भायखळा हे विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. मात्र, धारावी, वरळी, भायखळा, मस्जिद बंदर या विभागांत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आले आहे. कोरोना रुग्णांवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळत असताना मुंबईत रोज हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. यामुळे मुंबईमधील कोरोना रुग्णांचा आकडा 76 हजार 294 वर पोहोचला आहे.
रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 41 दिवसांवर -
मुंबईमधील रुग्ण दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी 41 दिवसांवर पोहोचला आहे. खार येथील एच पूर्वमध्ये रुग्णवाढीचा सरासरी दर फक्त अर्ध्या टक्क्यावर तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आता तब्बल 129 दिवसांवर पोहोचला आहे. रुग्णवाढीचा सरासरी दर एच पूर्व, बी, एफ उत्तर या 3 विभागांत एक टक्क्यापेक्षा कमी आहे. एच पूर्वेतील रुग्णवाढीचा सरासरी दर 0.5 टक्का, बी विभागात 0.6 टक्का तर एफ उत्तरमध्ये 0.7 टक्का इतका आहे. तर एम पूर्व, ए, ई, एल या 4 विभागात हा दर 1 टक्क्यावर आला आहे.
4 हजारांहून अधिक रुग्ण असलेले विभाग -
मुंबईमधील सहा विभागात 4 हजारांहून अधिक रुग्ण असल्याची आकडेवारी पालिकेने दिली आहे.
- अंधेरी पूर्व - 5 हजार 172
- दादर माहीम धारावी 4 हजार 811
- अंधेरी पश्चिम 4 हजार 421
- मालाड 4 हजार 396
- भांडुप 4 हजार 240
- कुर्ला 4 हजार 51.
- तर मस्जिद बंदर या भागात फक्त 750 कोरोनाबाधित आढळले आहेत.