मुंबई - राज्याच कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असल्याचे दिसून येत आहे. आज राज्यात 13 हजार 659 बाधित रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रातील आजचा बाधितांचा आकडा हा नवीन वर्षातील सर्वात जास्त असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबई शहर परिसरात आज 1539 नवे रुग्ण आढळून आले असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत बोरिवली, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, टिळकनगर आदी विभाग कोरोनाचे 'हॉटस्पॉट' ठरले आहेत. या विभागात कोरोनाचे नियम पाळावेत म्हणून सोसायट्यांना पालिकेने नोटीस बजावल्या आहेत. मुंबईत सध्या 11 हजार 379 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 215 दिवस इतका आहे. मुंबईतही लसीकरण सुरू असून ज्येष्ठ नागरिक आणि विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांचे लसीकरणाचे लक्ष्य लवकर पूर्ण व्हावे, यासाठी खासगी रुग्णालयातील लसीकरण 24 तास सुरू ठेवण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे मुंबईत दिवसाला 1 लाख लाभार्थ्यांना लस देता येणे शक्य होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पुण्यात टाळेबंदी नाही, पण...
पुणे शहरात गेल्या महिन्याभरापासून मोठ्या प्रमाणात रुग्णांमध्ये वाढ होत आहे. जानेवारी महिन्यात पुणे शहरात फक्त 1500 सक्रीय रुग्णसंख्या होती. ती आजमितीला 7000 वर गेली आहे. पुणे शहरात कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी शहरात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. तसेच शाळा महाविद्यालयेदेखील 14 तारखेपर्यंत बंद करण्यात आले आहे. असे असले तरी शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी येणाऱ्या काळात पुणे शहरात टाळेबंदी नव्हे तर अजून काही कडक निर्बंध लावण्यात येतील, असे संकेत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले. पुणे शहरातील कोरोनाबाबतची बैठक येत्या दोन दिवसात पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीत शहरात काही निर्बंध लावण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात मोठी रुग्णवाढ
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी दिवसभरात 550 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या आजपर्यंतची उच्चांकी संख्या असल्याने जिल्हा प्रशासनासमोरील चिंतेत भर पडली आहे. रोज नव्याने चारशेवर रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यात अंशतः टाळेबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामध्ये सकाळी सहा ते रात्री नऊ या काळातच बाजारपेठा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर शनिवार आणि रविवार दोन दिवस बाजारपेठा, हॉटेल, मॉल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आनंदवन पुन्हा एकदा कोरोनाचे 'हॉटस्पॉट'
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रख्यात आनंदवन पुन्हा एकदा कोरोनाचे 'हॉटस्पॉट' ठरले आहे. सध्या येथे तब्बल 239 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याने प्रशासनाने येथेच कोविड केअर केंद्र उघडले आहे. येथे तपासणी करण्यात आलेल्यापैकी 239 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या एकूण 83 प्रकल्प रहिवाशांवर सुरू आहेत. स्थानिक आरोग्य यंत्रणेने परिसरात चाचण्यांसाठी केंद्र उभारले आहे. वरोरा आणि त्यातही आनंदवन प्रकल्प कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाचे लक्ष लागलेले आहे.
कोरोना केंद्रात आढळल्या मद्याच्या बाटल्या
शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरू असलेल्या मनपा कोविड केअर सेंटरमध्ये बुधवारी दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला. या सेंटरमध्ये दाखल असलेल्या एका रुग्णाने चक्क 4 मद्याच्या बाटल्या तसेच गुटख्याच्या पुड्या आतमध्ये आणल्या होत्या. मद्य पिऊन तो रुग्ण गोंधळ घातला होता. या प्रकाराची माहिती होताच महापौर भारती सोनवणे यांनी सेंटरमध्ये धाव घेत मद्यपी रुग्णाची कानउघाडणी केली. मनपा कोविड केअर सेंटरमध्ये दररोज रुग्णांची संख्या वाढत असून, महापौर भारती सोनवणे सेंटरमध्ये भेट देऊन रुग्णांची विचारपूस करीत असतात. बुधवारी अविनाश पाटील नामक एक रुग्ण मद्य पिऊन गोंधळ घालत असल्याची माहिती महापौर सोनवणे यांना मिळाली. त्यानंतर त्या तत्काळ त्याठिकाणी पोहचल्या. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, डॉ. विजय घोलप यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.