मुंबई : मुंबईमध्ये यंदा पाऊस उशिरा सुरु झाला. त्यानंतर थंडीही चांगली पडली होती. गेले काही दिवस उष्णता सुरू होती. त्यानंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत उष्णता तर रात्री थंडी, असे वातावरण झाले आहे. वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाल्याने त्याचे परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहेत. मुंबईमध्ये बहुतेक ठिकाणी बांधकाम सुरु असल्याने धुळीमुळे प्रदूषण झाले आहे. त्यातच वातारण आणि ऋतू बदल यामुळेही नागरिक आजारी पडत आहेत. श्वसनाच्या त्रासासोबत सर्दी, खोकला याचे रुग्ण सध्या मुंबईमधील रुग्णालयात आणि डॉक्टरांकडे उपचारासाठी गर्दी करत आहेत.
लहान मुलांमध्ये आजाराचे प्रमाण अधिक : मुंबईत गेले तीन वर्षे कोविडचा प्रसार होता. हा प्रसार कमी झाला आहे. गेले दोन महिने जे जे रुग्णालयात कोविडचा एकही रुग्ण दाखल झाला नव्हता. आता सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढले आहेत. आमच्या ओपीडीमध्ये रोज १०० ते ३०० रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. गेल्या काही दिवसात त्यात आणखी १०० रुग्णांची वाढ झाली आहे. लहान मुलांमध्ये हे आजार जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. लहान मुलांमध्ये खोकला जायला जास्त वेळ लागत आहे, अशी माहिती जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली.
रुग्णांना दाखल करण्याची गरज नाही : सध्या सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांचे रुग्ण वाढत असले, तरी त्यामुळे निमोनिया होऊन त्या रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली नाही. ऋतू बदलतो तसे त्याचे विषाणू बदलतात. थंडीनंतर उन्हाळा आणि आता पुन्हा थंडी असे वातावरणात बदल झाले आहेत. त्यामुळे व्हायरल आजाराचे रुग्ण वाढले आहेत. ऋतू बदलल्यावर आजार कमी होतात. आता होळी येत आहे. होळीनंतर हे ऋतूचे आजार नक्क्की कमी होतील, असे डॉ. सापळे म्हणाल्या.
अस्थमा रुग्णांनी काळजी घ्यावी : अस्थमा रुग्णांची संख्या वाढते आहे. थंडी असल्यामुळे हवा खाली राहते. त्यात धूळ असते. लहान मुले, धुळीची ऍलर्जी तसेच इतर ऍलर्जी आहे, अशा रुग्णांची संख्या सुद्धा वाढली आहे. अस्थमा असलेल्या रुग्णांचा आकडा वाढतो आहे. त्यांना नेब्युलायझेशन देण्याची गरज पडत आहे. त्यामुळे सकाळी थंडी असेल, धुके असेल अशावेळी अस्थमा झालेल्या लोकांनी मॉर्निंग वॉक करू नये. थोडे ऊन आल्यावर आणि हवा शुद्ध झाल्यावर मॉर्निंग वॉक करावी. धुळीचा त्रास ज्यांना आहे, ते लोक आजही मास्क घालत आहेत. त्यामुळे ज्यांना अस्थमा सारखे आजार आहेत, ते रुग्ण मास्क घालू शकतात असे डॉ. सापळे यांनी सांगितले.