मुंबई - राज्यात 10 जूनला मॉन्सूनने ( monsoon update ) हजेरी लावली. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विविध जिल्ह्यात वादळी पाऊस बरसला आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड तसेच कोकणातील काही तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. मॉन्सूनची आस लागताच शेतकऱ्यांनीही आता पेरणीच्या कामाला सुरुवात केली आहे. तर तिकडे विदर्भातही ( Vidarbha Monsoon ) अनेक ठिकाणी पाऊस बरसला असून शेतकऱ्यांमध्ये आनंद पाहायला मिळत आहे. हळूहळू महाराष्ट्रभर मॉन्सून दाखल होत आहे. त्यामुळे दररोज राज्यातील विविध जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसत असल्याचे चित्र आहे.
'या' भागात आगामी पाच दिवस पावसाची शक्यता : आगामी पाच दिवस राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून, सुरुवातीस तळकोकणात असलेल्या मॉन्सूनने आता अर्धा महाराष्ट्र व्यापला आहे. मुंबईसह कोकणातील बहुतांश भागात, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकातील आणखी काही भागांमध्ये मॉन्सून दाखल झाला ( Maharashtra Monsoon Updates ) आहे. मॉन्सून राज्यात दाखल झाल्याने राज्यात येत्या 5 दिवसांसाठी मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात पावसाची तीव्रता ही जास्त असण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने वर्तविली आहे.
राज्यात १०१ टक्के पावसाचा अंदाज : भारतीय हवामानशास्त्र विभागाने नुकतेच मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्याचा अंदाज जाहीर केला असून, त्यामध्ये देशात यंदा १०३ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. जूनमध्ये राज्याच्या दक्षिण कोकण, मुंबई तसेच पश्चिम विदर्भाच्या काही जिल्ह्यांत कमी पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात १०१ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रातील 'या' मॉन्सूनच्या सरी :
मुंबई शहर विभागात सर्वाधिक पाऊस : मुंबईत शुक्रवारी ( दि. 10 जून ) रात्रीपासून पावसाला ( monsoon mumbai news ) सुरुवात झाली आहे. शनिवारी मुंबईत पाऊस ( Rain in Mumbai ) दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. शनिवारी मुंबई शहर विभागात सर्वाधिक तर पूर्व उपनगरात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली. मुंबईत शनिवारी (दि. 11 जून) सकाळी 8 ते रविवार (दि. 12 जून) सकाळी 8 या 24 तासांत शहर विभागात 42.52, पूर्व उपनगरात 14.84 तर पश्चिम उपनगरात 21.45 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शहर विभागात सर्वाधिक पाऊस पडला तरी कुठेही पाणी साचण्याच्या घटना नोंद झालेल्या नाहीत. रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत आहेत.
कोकणात मॉन्सूनची हजेरी : मध्य महाराष्ट्र, कोकणात मॉन्सूनने हजेरी लावली आहे. राज्यातील तापमानातही घट होऊ लागली आहे. आजपासून पुढील चार दिवस मुंबईमध्ये हलक्या ते मध्यम सरीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, ठाणे, मुंबई, पालघर या भागांत वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. अरबी समुद्राच्या किनारी भागातील कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने हा पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणात पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
बीड जिल्ह्यात तलाव तुडुंब : बीड व नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर सावरगाव, मच्छिंद्रनाथ गड परिसरात शनिवारी दि.11 रोजी पहाटे मुसळधार पावसामुळे गर्भगिरी पर्वतरांगाखालील सर्व तलाव एकाच पावसात ओव्हरफ्लो झाले आहेत. आष्टी तालुक्यामध्ये गेल्या वर्षीपासून वरूण राजाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत 'दुष्काळ'मिटवून टाकला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही तालुक्यात मोठ्या पावसाची सुरुवात झाली आहे.आष्टी तालुक्यामध्ये रोहिणी नक्षत्र कोरडे गेले, मात्र मृग नक्षत्र सुरू होऊन चार दिवसानंतर तालुक्यातील इतर ठिकाणी रिमझिम पाऊस झाला आहे. तर मच्छिंद्रनाथ गड, सावरगाव शेडगेवाडी या परिसरामध्ये एकच पावसात सर्व तलाव तुडुंब भरले आहेत.
अमरावती शहरात मुसळधार पाऊस : अमरावती शहरात गुरुवारी दुपारी साडेचार वाजल्यापासून मुसळधार पाऊस कोसळला. मान्सूनपूर्व हा अवकाळी पाऊस असून, सलग तीन दिवस असा अवकाळी पाऊस बरसणार आहे, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. साधारणपणे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विदर्भात मान्सून दाखल होतो. शेतकरी तर ७ जून म्हणजेच मृग नक्षत्र लागताच पावसाचे आगमन झाल्याचे समजतात. मात्र, यंदा लांबलेल्या उन्हाळ्याने सर्व समीकरण चूकीचे ठरवले आहे. हवामान विभागाचे भाकीतही यंदा वाढलेल्या तापमानापुढे फिस्कटके. 13 जून ते 15 जूनच्या सुमारास तापमानात घट होऊन विदर्भात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोल्हापुराला पावसाचा फटका : कोल्हापूरकरांनी आतापर्यंत 3 वेळा महापुराचा सामना केला आहे. २००५, २०१९ आणि २०२१ या तिन्ही वर्षात अर्धे कोल्हापूर पाण्याखाली होते. २०१९ मध्ये तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवितहानीही झाली. आता हे सर्व सांगायचे कारण म्हणजे आता पावसाळा सुरू होत आहे. 2 जूनला आलेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण कोल्हापुरात धुमाकूळ घातला. शहरातील अनेक भागात पावसाने कंबरे एवढे पाणी साचले, तर काही ठिकाणी झाडेही पडली. त्यामुळे, शहरातील अनेक भागांत वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यात आता महापालिकेच्या पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या नालेसफाई, ड्रेनेज सफाईवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. नालेसफाईची कामे झाली असती तर, पहिल्याच पावसात कोल्हापूरची ही स्थिती झाली नसती, असा सूर नागरिकांमधून उमटत ( Kolhapur was flooded during pre monsoon rains ) आहे.
चक्रीवादळाचा नाशिक जिल्ह्यातील तालुक्यांना फटका : चक्रीवादळाचा मनमाड नांदगाव तालुक्यातील ( monsoon nashik news ) अनेक गावांना तडाखा बसला आहे. अचानकपणे आलेल्या या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. केळीच्या बागा, कांद्याचे शेड जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला ( rains damage banana orchards in nangaon nashik ) आहे. बुधवारी मनमाड शहरासह नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागात आलेल्या वादळी पावसाने कांद्याचे शेड जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे, शेकडो टन कांदा खराब झाला आहे. यासह बोराळे अमोदे येथील शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा उद्ध्वस्त झाले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा - Amravati Rain : अमरावतीत जोरदार वादळासह पाऊस; वाऱ्याने मॉलच्या काचा कोसळल्या