मुंबई- अरबी समुद्रात घोंगावणाऱ्या तौक्ते चक्रीवादळाचा परिमाण सकाळपासून मुंबईत सुरू झाला आहे. मुंबईत वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. मात्र त्याचवेळी मुंबईची तिसरी लाईफलाइन अर्थात मेट्रो 1 (वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर) सेवा तूर्तास सुरळीत सुरू आहे. तर मोनो रेल्वेची सेवा (चेंबूर-जेकब सर्कल) बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) कडून सांगण्यात आले आहे.
30 हजार प्रवाश्यांचा मेट्रोने प्रवास
कॊरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मेट्रो 1 आणि मोनोच्या फेऱ्या आणि सेवा कालावधी याआधीच कमी करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात मेट्रो आणि मोनोतून केवळ अत्यावश्यक सेवा मधील कर्मचाऱ्याच प्रवास करणाची मुभा आहे. तर लसीकरण आणि वैद्यकीय कारणास्तव प्रवास करता येतो. मात्र, त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे द्यावी लागतात. दरम्यान पहिल्या लॉकडाऊननंतर मेट्रो 1 सेवा सुरू झाल्यानंतर मेट्रो प्रवाशाची संख्या कमी होत पण ती मार्चमध्ये वाढून दिवसाला एक लाख अशी झाली होती. पण आता एप्रिलमध्ये दुसरे लॉकडाऊन लागल्यानंतर ही संख्या कमी झाली आहे. दिवसाला आता केवळ 30 हजार प्रवासी मेट्रोने प्रवास करत आहेत.
पावसाळा पूर्व कामाला सुरुवात
तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी घेण्यात आली आहे. तर आपली आपत्कालीन व्यवस्था सज्ज असल्याचे एमएमओपीएल (मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड) कडून सांगण्यात आले आहे. तर अजून तरी मेट्रो सेवा सुरळीत सुरू आहे. दरम्यान पावसाळा पूर्व कामाला आम्ही याआधीच सुरुवात केली आहे. सर्व तांत्रिक बाबीची देखभाल-दुरुस्ती करण्यात आली आहे. तर पावसात कोणतीही दुर्घटना घडू नये आणि मेट्रो सेवेवर कोणताही परीणाम होऊ नये यासाठी कामे सुरू आहेत. त्याचा फायदा एक होत आहे. आमची सर्व यंत्रणा सज्ज आहे असेही एमएमओपीएलने सांगितले आहे.