मुंबई - देशात सध्या ब्लॅकमेलिंगचे राजकारण सुरू आहे. यापूर्वी असे ब्लॅकमेलिंग कधी होत नव्हते. ते विनंतीचे राजकारण होते. भीतीचे, धमकावण्याचे राजकारण करणाऱ्या मोदी - शाहांची ही टोळी लुटारूंची टोळी आहे. या टोळीला सत्तेपासून दूर ठेवा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत केले.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर अनिल कुमार यांच्या प्रचारासाठी वरळी येथील जांबोरी मैदानात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत आंबेडकर यांनी मोदी - शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत या टोळीला देशातील जनतेने सत्तेपासून दूर ठेवावे, असे आवाहन केले.
देशाचे राजकारण बिघडलेले आहे, ते लवकरात लवकर सुधारले पाहिजे. तरच परिस्थिती हातात येईल. अन्यथा, ती भयंकर होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. राज्यात शिवसेना आणि भाजपची झालेली युती ही राजीखुशीने झालेले नाही. त्यासाठी भीती आणि इडीचा धाक होता, असा आरोप त्यांनी केला. देशातील कुटुंबशाही संपली पाहिजे म्हणूनच आपण कैकाडी,लोहार, वडार, पारधी समाजातील लोकांना सत्तेत वाटा मिळावा म्हणून उमेदवारी दिली, असा दावाही आंबेडकर यांनी केला.
देशात २०१४ नंतर मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली. अर्थव्यवस्था कोलमडून गेली. लोकांमध्ये जाती-धर्माच्या नावाने दहशत निर्माण झाली. लोक भयभीत झाले. शेतकरी संकटात सापडला तरीही मोदी सरकारने काही उपाययोजना केली नाही. मोदींना देशातील लोकांनी देशाची प्रगती व्हावी म्हणून मतदान केले होते, परंतु मोदींच्या पंतप्रधान पदानंतर केवळ दोन कुटुंबाचा विकास झाला. आज त्यातील एक कुटुंब मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा देत आहे.