मुंबई : चीन, जपान, अमेरिकासारख्या देशांमध्ये करोनाची वाढती रुग्णसंख्या बघता देशातही सर्व शासकीय रुग्णालयांना तयार राहण्याचे संकेत ( wake of the Corona virus ) मिळालेले आहेत. सर्व शासकीय रुग्णालयांचा आढावा घेण्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार आज संपूर्ण देशात रुग्णालयातील तयारीचा आढावा घेऊन मॉकड्रिल ( Mock drill ) घेण्यात येत आहे. अत्यावस्थ कोविड रुग्ण रुग्णालयात आला तर कशाप्रकारे हाताळणी करायची, आवश्यक मनुष्यबळ , औषधे , ऑक्सिजन इत्यादी बाबी तयार आहेत किंवा नाही हे तपासण्यासाठी मॉक ड्रिल घेतले जात आहे. मुंबईच्या जे जे रुग्णालयातही मॉक ड्रिल ( Mock drill conducted at J J Hospital ) घेण्यात आले.
आरोग्य सुविधांबाबत आढावा : चीनमधील करोना उद्रेकानंतर केंद्र सरकार खबरदारीची पाऊलं उचलंत आहे.केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिलेल्या आदेशानुसार चीनमधील वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज देशातील सर्व महत्वांच्या रुग्णालयांमध्ये मॉकड्रिल पार पडत आहे, मुंबईतील जे जे रुग्णालयातही आज मॉक ड्रिल करण्यात आले. रुग्णालयामधील ऑक्सिजन उत्पादन यंत्रांसह आरोग्य सुविधांबाबतच्या तयारीचा आढावा यात घेण्यात आला.
जे जे रुग्णालयाची स्थिती : कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण तपासणी साठी रुग्णालयात आल्यानंतर प्राथमिक उपचारापासून अंतिम टप्प्यापर्यंत कशा पद्धतीने त्या रुग्णाची सेवा केली पाहिजे, कशा पद्धतीने त्याच्यावर प्राथमिक उपचार करायला पाहिजेत, या संदर्भामध्ये आढावा घेण्यात आला. सध्या जे जे रुग्णालयामध्ये १३५२ बेड हे करोना रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे आयसोलेशन बेड, आयसीयु बेड, ऑक्सीजन पुरवठा, मेडिकल स्टाफ, व्हेंटिलेटर यासारख्या सुविधांची व्यवस्था करणे फार गरजेचे असल्याने त्या पद्धतीने सुद्धा आढावा घेण्यात आला.
काळजी नाही पण खबरदारी घ्यावी : याविषयी बोलताना जे जे रुग्णालयाचे डॉ. अशोक आनंद यांनी सांगितले आहे की, देशात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. काळजी करण्याचे कारण नाही. परंतु खबरदारी घेणे गरजेचे आहे. ऑक्सीजन प्लान्टपासून ते डॉक्टर, मेडिकल स्टाफ, व्हेंटिलेटर, कॉन्सेंट्रेटर या सारख्या सुविधांची व्यवस्था करणे गरजेचे आहे. यापूर्वी अनेकांनी करोनाचे दोन्ही डोस तसेच बूस्टर डोसही घेतले आहेत. यंदा रुग्ण फार कमी आहेत. नवीन व्हेरियंटचे रुग्णअद्याप तरी नाही आहेत. देशात जे रुग्ण आहेत त्यांना नवीन व्हेरियंटचे सिमटम नाही आहेत. ऑक्सिजन, बेड, यंत्रसामग्री योग्य प्रमाणात उपलब्ध आहे म्हणून घाबरण्याचं काही कारण नाही. तसेच करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा अनुभव हा यंदा उपचारार्थ कामी येणार असल्याचंही डॉ. अशोक आनंद यांनी सांगितले आहे.